अहमदाबाद – गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक प्रचाराने चांगलाच जोर आलेला आहे. भाजप आणि काँग्रेस एकमेकांवर जोरदार हल्ले चढवत आहेत. आता पंतप्रधान मोदींचे विकास मॉडेल फ्लॉप झाल्याचे वक्तव्य काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी केले आहे.
ज्याप्रमाणे सिनेमा फ्लॉप होतो, तशा प्रकारे मोदींचे विकास मॉडेल फ्लॉप झाल्याची टीका काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधीं यांनी केली आहे. गुजरात निवडणुकांच्या प्रचारामध्ये पंतप्रधान मोदी जपान, अफगाणिस्तानाच्या गोष्टी करत आहेत, थोडे फार गुजरात बद्दलही बोला, असा टोला राहुल गांधींनी लगावला.
आज मोदींच्या ३ जाहीर सभा तर राहुल यांच्या ४ प्रचार सभा आहेत. अहमदाबादमध्ये मोदी, राहुल आणि हार्दिकचा रोड शो होणार होता. त्यासाठी त्यांच्याकडून पोलिसांकडे परवानगी मागितली होती. मात्र वाहतूक कोंडीचे कारण देत गुजरात पोलिसांनी परवानगी नाकारली होती. मात्र तरीही पाटीदार अनामत आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या हार्दिक पटेल यांनी अहमदाबादमध्ये रोड शो केला. या रोडशोमध्ये जवळपास २ हजाराहून अधिक दुचाकीस्वार सहभागी झाले होते.