नवी दिल्ली: भारतात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ बऱ्याच राष्ट्रीय, आंतराष्ट्रीय स्तरावरच्या सेलिब्रिटींनी पोस्ट केल्या, फोटो शेअर केले. आता या यादीत अजून एका सेलिब्रिटीची भर पडली आहे. युट्युबर लिली सिंग हिनेही शेतकरी आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शवला आहे.
युट्यूबर लिली सिंग काल ग्रॅमी अवॉर्ड सोहळ्यात गेली होती. तिथला तिने एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिने मास्क परिधान केला आहे आणि या मास्कवर ‘I stand with farmers’ असा मजकूरही लिहिलेला आहे. लॉस एंजेलिसमधल्या ग्रॅमी अवॉर्ड सोहळ्यासाठी तिने हजेरी लावली आणि रेड कार्पेटवरचा अश्या पद्धतीचा मजकूर लिहिलेला मास्क परिधान केलेले फोटोज शेअर केले. यावेली तिने काळ्या रंगाचा सूट परिधान केला होता.
I know red carpet/award show pictures always get the most coverage, so here you go media. Feel free to run with it ✊🏽 #IStandWithFarmers #GRAMMYs pic.twitter.com/hTM0zpXoIT
— Lilly // #LateWithLilly (@Lilly) March 15, 2021
या फोटोवर तिने एक लक्षवेधी कॅप्शनही दिलेलं आहे. ती म्हणते, मला माहित आहे की रेड कार्पेट किंवा अवॉर्ड शोजमधल्या वेशभूषेला सर्वात जास्त कव्हरेज मिळतं. त्यामुळे माध्यमांनो, हे पाहा. मोकळेपणाने हेही दाखवा. अशा आशयाचं कॅप्शन देऊन तिने #IStandWithFarmers म्हणत शेतकरी आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शवला आहे.
पोस्ट केल्यानंतर जवळपास एका तासातच लिलीची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागली आहे. काही दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय गायिका रिहाना, पॉर्नस्टार मिया खलिफा आणि पर्यावरणवादी कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग यांनीही आपल्या ट्विट्सच्या माध्यमातून भारतातल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवला होता. मुख्यतः पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेशमधील हजारो शेतकरी सिंघू, टिकरी आणि गाझीपूर अशा दिल्लीच्या सीमांवर एकत्र येऊन नव्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करत आहेत.