Placeholder canvas
Monday, May 6, 2024
Homeदेशगुरुग्राम बाल हत्या प्रकरण: अखेर कंडक्टरची कोर्टाकडून निर्दोष मुक्तता,

गुरुग्राम बाल हत्या प्रकरण: अखेर कंडक्टरची कोर्टाकडून निर्दोष मुक्तता,

गुरुग्राम: गुरुग्राममधल्या एका प्रख्यात शाळेतील दुसरीतल्या मुलाच्या हत्येप्रकरणी बस कंडक्टरला निर्दोष सोडण्यात आले आहे. सप्टेंबरमध्ये पाच तारखेला या शाळेमध्ये दुसरीतल्या मुलाची हत्या झाल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली होती. पोलिसांना आठ तासांमध्ये अशोक कुमार या बस कंडक्टरला अटक केली आणि त्याच्यावर हत्येचा आरोप ठेवला.

हा तपास नंतर २२ सप्टेंबर रोजी सीबीआयकडे सोपवण्यात आला. सीबीआयच्या लक्षात आलं की अशोक कुमार हा गुन्हेगार नसून त्याच्याकडून पोलिसांनी जबरदस्तीनं कबुलीजबाब लिहून घेतला आहे. त्याच्याविरोधात कुठलाही पुरावा नसल्याचे सांगत सीबीआयने कंडक्टरला दोषमुक्त करण्याची कोर्टाकडे मागणी केली होती. तसे आरोपपत्र ५ फेब्रुवारी रोजी सीबीआयतर्फे सादर करण्यात आले. दरम्यान, नोव्हेंबरमध्ये कुमारला ५० हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामिन देण्यात आला होता. अशोक कुमारची आता झालेली निर्दोष मुक्तता गुरूग्राम पोलिसांना चपराक मानण्यात येत आहे.

या लहान मुलाची हत्या त्याच शाळेतल्या १६ वर्षांच्या दुसऱ्या एका मुलाने केल्याचे समोर आले आणि सगळ्या तपासाची दिशाच बदलली. शाळेच्या परीक्षा पुढे ढकलल्या जाव्यात आणि पालकांची बैठकही पुढे जावी यासाठी या १६ वर्षांच्या मुलानं ही हत्या केल्याचे सीबीआयच्या तपासात आढळले. अखेर, गुरूग्राम पोलिसांनी बळजबरीने आरोपी केलेल्या अशोक कुमारची निर्दोष मुक्तता झाली आहे.

सीबीआयने एक हजार पानांचं आरोपपत्र सादर केलं आहे. त्या दुसरीतल्या मुलाच्या हत्येशी अशोक कुमार या कंडक्टरचा कुठलाही संबंध असल्याचे तपासात निष्पन्न झाले नसल्याचे सीबीआयने स्पष्ट म्हटले आहे. त्यामुळे त्याला मुक्त करण्यात यावे अशी मागणी सीबीआयनं केली.

विशेष म्हणजे अकरावीतला संशयित मुलगा १६ वर्षांचा असून त्याला ज्येष्ठ म्हणून खटला चालवावा असा युक्तिवाद करण्यात येत आहे. या प्रकरणाचं एकूण संवेदनशील स्वरुप बघता कोर्टानं खरी नावं न देण्याचा आदेश कोर्टानं मीडियाला दिला होता. त्यानुसार दुसरीतल्या हत्या झालेल्या दुर्दैवी मुलाला प्रिन्स, अल्पवयीन आरोपीला भोलू व शाळेचं नाव विद्यालय असं संबोधण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments