Placeholder canvas
Saturday, April 27, 2024
Homeदेशगुजरातच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा विजय रुपाणी

गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा विजय रुपाणी

अहमदाबाद भारतीय जनता पार्टीने गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी विजय रुपाणी यांचीच पुन्हा नियुक्ती केली आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाने ९९ जागा मिळवत बहुमत मिळवले आणि सलग सहाव्यांदा सत्ता स्थापन करण्याचा दावा केला. गुजरातचा मुख्यमंत्री कोण होणार याबाबत उलटसुलट चर्चा होत होत्या, परंतु केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी विजय रुपाणी यांच्या नावाची घोषणा केली आणि चर्चांना विराम दिला.

विद्यमान मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचीच नव्याने मुख्यमंत्रीपदी नेमणूक होईल अशी अटकळ होती. परंतु, गेल्या निवडणुकीच्या ११६ जागांच्या तुलनेत यंदा कमी जागा आल्या, तसेच अमित शाह यांनी ठेवलेले १५० जागांचे लक्ष्यही फारच दूर राहिले या पार्श्वभूमीवर रुपाणींना बगल देऊन अन्य कुणाला संधी दिली जाते की काय अशी अटकळ व्यक्त होत होती.

सुरुवातीला अमित शाह यांनी १५० जागांहून मोठे लक्ष्य ठेवण्याचा म्हणजे शिवधनुष्य पेलू पाहण्याचाच प्रयत्न केला होता. गुजरातमध्ये २२ वर्षे सत्ता उपभोगल्यानंतर भाजपाला सत्ताधाऱ्यांविरोधातील असंतोषाला सामोरे जावे लागेल अशी शक्यता होती. परंतु, सुरुवातीच्या जनमत चाचण्यांमध्ये भाजपाला १३५ जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला होता त्यामुळे १५०चे लक्ष्यही गाठता येईल असे भाजपाच्या पाठिराख्यांना वाटत होते. मात्र राहुल गांधींच्या घणाघाती प्रचारानंतर आणि हार्दिक, जिग्नेश व अल्पेश यांच्या विरोधात जनमत बदलायला लागले. नंतरच्या जनमत चाचण्यांमध्ये भाजपाला ९२ ते १०५ जागा देण्यात आल्या.

तेव्हाच, विजय रुपाणी यांचा गुजरातमध्ये प्रभाव नसून पंतप्रधान नरेंद्र मोदीच भाजपाचा मुख्य चेहरा असल्याचेही दिसून आले. प्रत्यक्षातही भाजपाला जेमतेम सत्ता राखण्याएवढ्या म्हणजे बहुमतापेक्षा अवघ्या सात जास्त जागा मिळाल्या. त्याचवेळी रुपाणींच्या नावावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र, विजय रुपाणींना भाजपानं आणखी एक संधी दिली असून पुढील पाच वर्षात चांगली कामगिरी करून पक्षाचं कमी झालेल्या मताधिक्य वाढवण्याची संधी आणि आव्हान दिलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments