Placeholder canvas
Sunday, April 28, 2024
Homeदेशफडणवीसांना हिंदुंचा एवढा कळवळा तर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री का होऊ दिलं नाही?

फडणवीसांना हिंदुंचा एवढा कळवळा तर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री का होऊ दिलं नाही?

माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांचा सवाल

पुणे : अलीगड मुस्लिम विद्यापीठाचा माजी विद्यार्थी शरजील उस्मानी याच्या वादग्रस्त विधानानंतर आता राजकारण अधिक तापलं आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फणडणवीस यांनी शरजीलवर कठोर कारवाईची मागणी केल्यानंतर आता माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांनी फडणवीसांवर निशाणा साधलाय. देवेंद्र फडणवीस यांना हिंदुंचा एवढाच कळवळा आहे, तर मग उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री का होऊ दिलं नाही? असा सवाल कोळसे-पाटील यांनी विचारलाय.

इतकच नाही तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होऊ नयेत म्हणून स्वत:चं मुख्यमंत्रीपद पणाला लावलं, असा घणाघातही कोळसे-पाटील यांनी फडणवीसांवर केलाय. राजधानी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणारेही हिंदूच आहेत. आमच्यार गुन्हे दाखल करायचे असतील तर करावेत. आमची भाषणं तपासावीत, आम्ही हिंदुंचा अपमान केलेला नाही, असा दावाही कोळसे पाटील यांनी केला आहे.

‘भावना दुखावल्या असतील तर माफी मागतो’

30 जानेवारी रोजी पुण्यात पार पडलेल्या एल्गार परिषेदत शरजील उस्मानी यांने हिंदू समाज पूर्णत: सडका बनला आहे, असं विधान केलं होतं. शरजीलच्या या वक्तव्यावरुन भाजपनं आक्रमक पवित्रा घेत, तातडीने कारवाई करा अन्यथा रस्त्यावर उतरु, असा इशारा सरकारला दिला आहे. त्यावर बोलताना शरजीलच्या वक्तव्यामुळे भावना दुखावल्या असतील तर त्यांची मी माफी मागतो. शरजीलने हिंदू ऐवजी मनुवाद हा शब्द वापरायला हवा होता. मात्र, मी त्याचा निषेध करणार नाही आणि त्याच्या वक्तव्याचं समर्थनही करणार नाही, असं कोळसे-पाटील म्हणालेत.

फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना इशारा

‘असा कुठला सडक्या डोक्याचा इसम महाराष्ट्रात येऊन हिंदूंना सडका म्हणत असेल आणि सरकार त्याच्यावर कारवाई करत नसेल तर भाजप स्वस्थ बसणार नाही. तात्काळ गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली नाही तर त्याविरोधात आम्ही आंदोलन करु,’ असा निर्वाणीचा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला दिलाय. एल्गार परिषद ही फक्त आग ओकण्याकरता, समजात तेढ निर्माण करण्यासाठी होते, असं माहिती असूनही परवानगी कशी मिळते. या परिषदेत हिंदूंच्या विरोधात बोललं जात आहे ते सरकारच्या मर्जीनं बोललं जात आहे का? असा सवालही फडणवीसांनी केलाय.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments