कन्नूर | आयसिस या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेशी संपर्कात असल्याच्या संशयावरून पाच तरुणांना केरळमधून स्थानिक पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कन्नूर भागात २५ ऑक्टोबर रोजी ही कारवाई करण्यात आली.
पोलिसांच्या माहितीनुसार, आयसिसच्या संपर्कात असलेले भारतीय तरुण परदेशातून केरळमध्ये दाखल होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी ही कारवाई केली. या पाच जणांना ताब्यात घेतल्यानंतर कन्नूरचे पोलीस उपअधीक्षक पी. पी. सदानंदन यांच्या नेतृत्वाखालील पथकाने त्यांची कसून चौकशी केली. यावेळी हे तीघेही तुर्कस्तानातून भारतात परतल्याचे समोर आले आहे. केरळमधील वेलापट्टणम आणि चक्करकल या भागातील ते मुळचे रहिवासी आहेत.
दहशतवादी कारवायांसारख्या गंभीर प्रकरणांशी संबंधीत असल्याने तसेच त्यांच्याकडून अधिक माहिती मिळवण्याचे प्रयत्न सुरु असल्याने पोलिसांनी या संशयीतांची ओळख अद्याप उघड केलेली नाही. गेल्या काही महिन्यांमध्ये आयसिस या मुलतत्ववादी दहशतवादी संघटनेचे भारतीय तरुणांना आकर्षण वाटत असल्याचे स्पष्ट झाले आहे. कारण, अशाच काही तरुणांना यापूर्वीही पोलिसांनी देशातील विविध भागातून ताब्यात घेतले होते.
दरम्यान, तीनच दिवसांपूर्वी भारतासह जगभरात आयसिससाठी भरती करणाऱ्या कारेन आयेशा हमिदन या महिलेला फिलिपाईन्समधून अटक करण्यात आली होती. कारेनने भारतातील तरुणांचे ब्रेनवॉश करुन त्यांना आयसिसमध्ये सामील करुन घेतले होते. कारेनबाबत माहिती गोळा करण्यासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) फिलिपाईन्सशी पत्रव्यवहारही सुरु केला आहे.