भुवनेश्वर – ओडिशाच्या राउरकेलामध्ये बुधवारी पहाटे एका फटाका मार्केटमध्ये आग लागल्याने अनेक दुकाने जळून खाक झाली. दुर्घटनेत एका जणाचा मृत्यू झाला आहे, तर ३ जण जखमी झाल्याचे कळते. फायर ब्रिगेडच्या अधिकाऱ्याने सांगितले की, एका दुकानात शॉर्टसर्किट झाल्याने आगीला सुरुवात झाली. पाहता-पाहताच या मार्केटमधील तब्बल ५० दुकानांना आगीने वेढले. आग एवढी भीषण होती की, अनेक किमीपर्यंत अग्निलोळ दिसत होते. माहिती मिळताच पोहोचल्या अग्निशमन कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले.
दुर्घटनेवेळी दुकानात झोपलेली होती माणसे…
– प्रत्यक्षदर्शी संजीव कुमार यांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, मी दुकानात झोपलेलो होतो, तेवढ्यात अचानक फटाक्यांचा फुटण्याचा आवाज आला. जीव वाचवण्यासाठी मी लगेच मार्केटबाहेर पळालो. अवघ्या काही मिनिटांतच पूर्ण मार्केटमध्ये आग पसरली. यातील एक दुकान माझेही होते.
झोपलेले होते दुकानदार…
– पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रात्री ३ च्या सुमारास आग लागली. त्या वेळी काही दुकानदार येथेच झोपलेले होते. सध्या आग लागण्याचे नेमके कारण स्पष्ट नाही. घटनेचा तपास सुरू आहे. शॉर्टसर्किटने आग लागल्याचे समोर येत आहे. मृत्युमुखी पडलेल्या आणि जखमींची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.