दिब्रुगढ (आसाम) : “नागपूरमध्ये जन्म झालेली एक संघटना आख्ख्या देशावर नियंत्रण प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतेय”, अशा शब्दांत काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी आरएसएसवर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे. राहुल गांधी सध्या आसामच्या आगामी विधानसभा निवडणुकांसाठी प्रचारसभा घेत असून दिब्रुगढमध्ये झालेल्या एका प्रचारसभेत त्यांनी भाजपप्रणीत केंद्र सरकारसोबतच आरएसएसवर देखील निशाणा साधला आहे.
You think democracy is declining. Youth is unemployed, farmers are protesting, CAA is there. We can’t ask the people of Assam to forget their culture, language if they come to Delhi. One force,born in Nagpur, trying to control the whole country: Rahul Gandhi in Dibrugarh, Assam pic.twitter.com/W1Txo035Bv
— ANI (@ANI) March 19, 2021
“देशात लोकशाहीचं पतन होत आहे. तरुण बेरोजगार आहेत. शेतकरी आंदोलन करत आहेत. सीएए सुद्धा आहे. आसामची जनता दिल्लीत आल्यानंतर त्यांनी त्यांची संस्कृती, भाषा बदलावी, अशी आपण अपेक्षा ठेऊ शकत नाही”, असं म्हणत राहुल गांधींनी CAA कायद्यावरून केंद्र सरकारवर देखील निशाणा साधला.
आसाममध्ये होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकांसाठी काँग्रेसनं जोरदार मोर्चेबांधणी केली असून स्टार प्रचारक राहुल गांधी आसाममध्ये सध्या प्रचारसभा घेत आहेत. २७ मार्च रोजी आसाममध्ये पहिल्या टप्प्यासाठी मतदान होणार असून दुसऱ्या टप्प्यासाठी १ एप्रिल तर तिसऱ्या टप्प्यासाठी ६ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तर २ मे रोजी निवडणुकांचा निकाल लागणार आहे.
भाजपा आणि आसाम गण परिषद यांच्याविरुद्ध काँग्रेस आणि एआययूडीएफ असा हा थेट सामना होणार आहे. २००१मध्ये सत्तेत आल्यापासून पहिल्यांदाच २०१६मध्ये काँग्रेस पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर सत्तेत आलेल्या भाजपाने सरबानंद सोनोवाल यांना मुख्यमंत्रीपदी बसवलं.
राहुल गांधींनी दिली ५ आश्वासनं!
पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधताना राहुल गांधींनी आसामच्या जनतेला ५ आश्वासनं दिली आहेत. “भाजपाने आसामच्या चहाच्या मळ्यातल्या मजुरांना ३५१ रुपये रोज देण्याचं आश्वासन दिलं. पण प्रत्यक्षात १६७ रुपयेच दिले जातात. पण मी नरेंद्र मोदी नाही, मी फसवणार नाही. आज मी तुम्हाला ५ गोष्टींची खात्री देतो.
- चहाच्या मळ्यातल्या मजुरांसाठी ३६५ रुपयांचा दर.
- सीएएला विरोध.
- राज्यात ५ लाख रोजगाराच्या संधी.
- २००युनिटपर्यंत मोफत वीज.
- प्रत्येक गृहिणीसाठी २००० रुपये.