Friday, December 6, 2024
Homeदेशइंधन दरवाढ करून जनतेला लुटणारे, भाजपचे लुटारु सरकार;नाना पटोलेंचे टीकास्त्र

इंधन दरवाढ करून जनतेला लुटणारे, भाजपचे लुटारु सरकार;नाना पटोलेंचे टीकास्त्र

congress-mla-nana-patole-criticized- raising fuel prices-bjp-govenment
congress-mla-nana-patole-criticized- raising fuel prices-bjp-govenment

मुंबई: पेट्रोल डिझेलवर अवाजवी करवाढ करून दिवसाढवळ्या जनतेच्या कष्टाच्या कमाईवर दरोडा घालणारे केंद्रातील भाजपचे सरकार लुटारू आहे, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

पेट्रोल, डिझेल व स्वयंपाकाच्या गॅसमध्ये प्रचंड दरवाढ करून केंद्रातील मोदी सरकारने जनतेचे जगणे मुश्कील केले आहे. या इंधन दरवाढीचा विरोध करण्यासाठी काँग्रेसचे सर्व मंत्री, आमदार आणि नेत्यांनी आज मंत्रालयासमोरील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन करून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह काँग्रेस मंत्री व आमदारांनी सायकलवरून प्रवास करत अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी विधान भवनात पोहोचले.

यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर निचांकी पातळीवर असताना केंद्र सरकार इंधनावर भरमसाठ करवाढ करत लुट करत आहे. त्यात आणखी १८ रुपये रस्ते विकास सेसच्या माध्यमातून तर ४ रुपये कृषी सेसच्या माध्यमातून घेतले जात आहेत.

करांशिवाय आज पेट्रोलची किंमत 32 रुपये 72 पैसे प्रति लिटर आणि डिझेलची किंमत 33 रुपये 46 पैसे प्रति लिटर आहे. पण मोदी सरकारने डिझेलवर 820 टक्के तर पेट्रोलवर 258 टक्के एक्साईज ड्यूटी लावून पेट्रोलचे दर 100 रुपये लिटर वर तर डिझेलचे दर 90 रुपये लिटरपर्यंत वाढवले आहेत. मुंबईत पॉवर पेट्रोलचे दर 100 रुपयांच्या वर गेले आहेत.

आज पुन्हा एलपीजी गॅस सिलींडरच्या दरात २५ रुपयांची वाढ केल्यामुळे गॅस सिलिंडरचा दर ८२५ रुपये झाला आहे. जनतेमध्ये या महागाईविरोधात प्रचंड असंतोष असून मोदी सरकारने निर्लज्जपणाच्या सर्व मर्यादा पार केल्या आहेत. जनता महागाईने होरपळून गेली असताना थंडीमुळे दरवाढ झाल्याचा जावाई शोध लावून केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद प्रधान यांनी लोकांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. केंद्र सरकारने ही दरवाढ तात्काळ मागे घ्यावी असे पटोले म्हणाले.

यावेळी माध्यमांशी बोलताना महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, भाजपचे नेते 2014 पूर्वी इंधन दरवाढीवरून आरडाओरडा करत होते, मात्र आज तेच नेते नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली इंधन दरवाढ करून जनतेची लूट करत आहेत. दररोज आज इंधनाचे दर वाढत आहेत, जनतेच्या खिशातील पैसे अन्यायकारक पद्धतीने लुटले जात आहेत.

मोदी सरकारला जनतेचा आवाज ऐकू येत नाही, त्यांच्या बहिरेपणावर इलाज करणे गरजेचे आहे. आम्ही आज सायकल रॅली काढून मोदी सरकारला इंधन दरवाढ मागे घ्या हे ठणकावून सांगितले आहे. जनतेच्या वेदना केंद्र सरकारपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. केंद्र सरकारने याची दखल घ्यावी अन्यथा उद्रेक होईल असा इशारा त्यांनी दिला.

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवर, वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख, महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आ. भाई जगताप, राज्यमंत्री सतेज पाटील, राज्यमंत्री विश्वजित कदम, विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गट नेते शरद रणपिसे, माजी मंत्री व प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष नसीम खान, आ. कुणाल पाटील, आ. प्रणिती शिंदे, आ. अमित झनक, आ. धिरज देशमुख, आ. हिरामण खोसकर, आ. लहू कानडे, आ. डॉ. सुधीर तांबे, आ. प्रतिभा धानोरकर, आ. सुलभा खोडके, आ. मोहनराव हंबर्डे, आ. सुभाष धोटे, आ. राजू पारवे, आ. राजू आवळे, आ. शिरीष नाईक, आ. ऋतुराज पाटील, आ. जयंत आसगावकर, प्रदेश सरचिटणीस रामकिशन ओझा, प्रदेश प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे, अतुल लोंढे, डॉ. संजय लाखे पाटील, सचिव राजाराम देशमुख यांच्यासह काँग्रेसचे आमदार सहभागी झाले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments