Placeholder canvas
Wednesday, May 1, 2024
Homeदेशचांद्रयान-2 चा चंद्राच्या कक्षेत प्रवेश

चांद्रयान-2 चा चंद्राच्या कक्षेत प्रवेश

नवी दिल्ली: २२ जुलैला अवकाशात भरारी घेऊन चंद्राच्या दिशेने मार्गक्रमण करणाऱ्या ‘चांद्रयान२’ ने २५ दिवसांचा प्रवास पूर्ण केल्यानंतर एक संदेश ‘इस्रो’ला दिला आहे.  हळूहळू चांद्रयान२ चंद्राच्या कक्षेत प्रवेश करत असून ७ सप्टेंबरला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार असल्याची माहिती या संदेशातून मिळाली आहे.

भारतीय प्रमाणवेळेनुसार, आज पहाटे २ वाजून २१ मिनिटांनी ‘चांद्रयान-२’ने पृथ्वीची कक्षा सोडली.’इस्रो’ ने ट्रान्स लूनर इंजेक्शन यशस्वीरित्या पूर्ण केले आहे. यानाचे लिक्विड इंजिन १२०३ सेकंदासाठी फायर करण्यात आले. यानंतर गेले २२ दिवस पृथ्वीच्या कक्षेत असलेले चांद्रयान-२ चंद्राच्या दिशेने झेपावले आहे.’इस्रो’ चे अध्यक्ष के.सिवन यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘चांद्रयान-२’ हे पुढील सहा दिवस चंद्राच्या दिशेने प्रवास सुरू ठेवणार आहे. जवळपास ४.१ लाख किलोमीटरचा प्रवास करून ते २० ऑगस्टला अंतिम कक्षेत पोहोचेल. त्यानंतर २७ दिवसांनी ७ सप्टेंबरला ते चंद्रावर उतरणार आहे.

पृथ्वीची कक्षा सोडल्यानंतर यासंदर्भात एक संदेश चांद्रयान२ ने दिला आहे.’ नमस्कार!’ मी चांद्रयान-२ आहे.मला देशाच्या नागरिकांना हे सांगायचे होते की आतापर्यंतचा प्रवास उत्तम झाला असून सात सप्टेंबरला मी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे. मी कुठे आहे, हे जाणून घेण्यासाठी संपर्कात राहा,’ असा संदेश यानानं पाठवला आहे.’इस्रो’ ने ट्विटच्या माध्यमातून या संदेशाची माहिती दिली आहे.

दरम्यानची १५ मिनिटं ही अत्यंत महत्त्वाची

चंद्रावर पोहोचण्यासाठी यानाला ४० दिवसांपेक्षा अधिक कालावधी लागणार असला तरी चंद्रावर उतरण्यापूर्वीची शेवटची १५ मिनिटं अत्यंत महत्तवाची असणार आहेत. चंद्रापासून ३० किलोमीटर इतक्या अंतरावर गेल्यानंतर चांद्रयान-२ ची गती कमी होणार आहे. याच दरम्यानची १५ मिनिटं ही अत्यंत महत्त्वाची ठरणार आहेत. भारत पहिल्यादाच सॉफ्ट लँडिंग करणार आहे. केवळ इस्रोसाठीच नाही, तर संपूर्ण भारतीयांसाठीच ही १५ मिनिटं आव्हानात्मक असतील, अशी माहिती ‘इस्रो’ प्रमुख के.सिवान यांनी दिली आहे. सॉफ्ट लँडिंग करण्यात भारत यशस्वी झाल्यास असे करणारा तो जगातील चौथा देश ठरणार आहे. आतापर्यंत अमेरिका, रशिया आणि चीन यामध्ये यशस्वी झाला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments