दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची चोरीला गेलेली निळ्या रंगाची वॅगन-आर (Wagon R) कार पोलिसांना सापडली आहे. दिल्ली सचिवालयाच्या बाहेरुन ही कार चोरीला गेली होती. गाझियाबादच्या मोहननगरमधून पोलिसांनी कार ताब्यात घेतली आहे. पोलिसांना कारमध्ये तलवार सापडली आहे. ‘त्याच रंगाची आणि मॉडेलची कार आम्हाला गाझियाबादमध्ये सापडली आहे. आम्ही इंजिन आणि इतर गोष्टी तपासत आहोत’, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे.
दुस-यांदा मुख्यमंत्रीपदाची सुत्रे स्विकारण्यापूर्वी अरविंद केजरीवाल या कारचा वापर करत होते. २०१३ मध्ये दिल्लीचे ४९ दिवसांचे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी हीच कार वापरली होती. भ्रष्ट्राचारविरोधी आंदोलनावेळी केजरीवाल यांनी या आयकॉनिक कारचा सर्वाधिक वापर केला होता. त्यानंतर त्यांनी ही कार हरयाणातील आम आदमी पार्टीचे नेते नवीन जयहिंद यांना वापरायला दिली होती. आपल्या कॉमन मॅन इमेजला साजेशी गाडी म्हणून या कारचा केजरीवाल वापर करत. सध्या आम आदमी पक्षाच्या मीडिया सेलकडून या कारचा वापर होत होता. केजरीवाल सध्या इनोव्हामधून फिरतात.