नवी दिल्ली | गुजरात निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी हे वारंवार भाजपवर टीका करताना दिसत आहेत. आजही मिश्कील शैलीतला एक ट्विट करत त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. ‘डॉक्टर जेटली नोटबंदी और जीएसटीसे अर्थव्यवस्था आयसीयूमें है.. आप कहते हैं आप किसीसे कम नहीं, मगर आपकी दवा में दम नहीं’ असा ट्विट करत राहुल गांधींनी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांची खिल्ली उडवली आहे. याआधीही राहुल गांधी यांनी जीएसटी म्हणजे गब्बर सिंग टॅक्स म्हणत ट्विट केले होते आता पुन्हा एकदा देशाच्या अर्थव्यवस्थेवरून राहुल गांधी यांनी केंद्रीय अर्थमंत्र्यांची फिरकी घेतली आहे.
डॉ जेटली, नोटबंदी और GST से अर्थव्यवस्था ICU में है।
आप कहते हैं आप किसी से कम नहीं,
मगर आपकी दवा में दम नहीं— Office of RG (@OfficeOfRG) October 26, 2017
काँग्रेसच्या काळातही जीएसटी बाबत विचार झाला होता. हा टॅक्स सोपा आणि साधा असेल अशी आमची धारणा होती. मात्र भाजपने लोकांचे पैसे हडप करण्यासाठी या टॅक्सची अंमलबजावणी केली असा आरोप राहुल गांधी यांनी केला. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी गुजरात विधानसभेची निवडणूक जिंकण्यासाठी कसून तयारी केली आहे.
भाजपसाठी गुजरातची निवडणूक हा प्रतिष्ठेचा विषय आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून पहिल्यांदाच गुजरात विधानसभेसाठी निवडणुका होत आहेत. त्यामुळे या निवडणुका जिंकणे त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. अशात टीका करण्याची एकही संधी काँग्रेसकडून सोडली जात नाहीये. राहुल गांधी यांच्या टीकेचा परिणाम काँग्रेसला चांगली मते मिळण्यावर होतो का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
गुजरात निवडणुकांच्या तारखा बुधवारीच जाहीर करण्यात आल्या. आता निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोपांचे राजकारण रंगणार यात शंकाच नाहीये. मात्र काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मात्र ट्विटचा आधार घेत केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांची खिल्ली उडवली आहे.