बिहार: नोटाबंदीच्या वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांनी भाजपवर निशाणा साधला. नोटाबंदीच्या माध्यमातून अनेक श्रीमंत लोकांचा काळा पैसा पांढरा झाला. तर गरीबांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. अमित शहा यांच्या संपत्तीत ३०० पटींनी तर त्यांच्या मुलाच्या संपत्तीत १६००० पटींनी वाढ झाली. हेच नोटाबंदीचे सर्वोच्च यश म्हणायला हवे, अशी खोचक टीका लालूंनी केली.
तसेच त्यांनी भाजपशी हातमिळवणी केलेल्या नितीश कुमार यांच्यावरही निशाणा साधला. घोटाळ्यांचे सूत्रधार असलेल्या नितीश कुमार यांना भाजपचा पाठिंबा असल्याचे लालूंनी म्हटले. एका व्यक्तीचा अहंकार शमविण्यासाठी ८ नोव्हेंबरला नोटाबंदीचा निर्णय घेण्यात आला. त्यामध्ये १५० लोकांचा बळी गेला. आम्ही भाजपचा विरोध करतो म्हणून आमच्यावर सीबीआयकडून छापे मारण्यात आले. मात्र, यामध्ये काळा पैसा मिळाला का, याचे उत्तर त्यांनी द्यावे. माझ्या संपूर्ण कुटुंबाला यामध्ये गोवण्याचा प्रयत्न होत आहे. मी त्यांच्याविरुद्ध लढतोय म्हणून ते असे करत आहेत. नितीश कुमार यांच्याप्रमाणे मीदेखील हार मानावी, असा त्यांचा प्रयत्न आहे. याशिवाय, सरकारने घेतलेला जीएसटीचा निर्णयही अयोग्य आहे. जगात ज्या ठिकाणी जीएसटी व्यवस्था अंमलात आणली गेली तिथे ती कायमच अपयशी ठरली. नोटाबंदी आणि जीएसटीमुळे देशात भाजपविरोधी वातावरण निर्माण झाले आहे, असे लालू प्रसाद यादव यांनी सांगितले.