आग्रा – धुक्याचा कहर आता दिसू लागला आहे. यमुना एक्सप्रेस-वेवर आज धुक्यामुळे भीषण अपघात झाला. या अपघातात एक-दोन नाही तर तब्बल ५० गाड्या एकमेकांवर येऊन धडकल्या. या विचित्र अपघातात अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.
ही दुर्घटना यमुना एक्सप्रेस-वेवर माइलस्टोन १२५ च्या जवळ घडली. येथे नोएडाहून आग्र्याला निघालेल्या ५० हून अधिक गाड्या एकमेकांवर येऊन आदळल्या. या दुर्घटनेत डझनभर लोक गंभीररित्या जखमी झाले आहेत. जखमींना स्थानिकांच्या मदतीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेच्या वेळी तेथे व्हिजिबिलिटी खूपच कमी होती. सर्वात आधी एक कार तेथे ट्रकला जाऊन आदळली. त्यानंतर पाठीमागून एकामागून एक येणाऱ्या गाड्या एकमेकांवर धडकू लागल्या. या दुर्घटनेमुळे एक्सप्रेस वेवरील वाहतूक बराच वेळ खोळंबली होती.