नवी दिल्ली: फेसबुक या लोकप्रीय सोशल नेटवर्किग साईटने जगभरातील लोकांना एकत्र आणण्याच काम केले. मात्र हेच फेसबुक आता ‘फेक’बुक ठरतंय की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे. कारण, फेसबुकवरील असंख्य अकाउंट बनावट असल्याचे समोर आले आहे. तसेच बनावट अकाउंट असल्याचे फेसबुकने स्वतःही कबूल केले आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये फेसबुक या सोशल नेटवर्किंग साईटचा प्रभावी वापर करण्यात येत आहे. मात्र फेसबुकच्या बनावट अकाउंटमध्ये रोज नव्याने भर पडत असून आता त्यांची संख्या कोट्यवधींच्या पुढे गेली आहे. २०१६ मध्ये अमेरिकेत झालेल्या निवडणुकीमध्ये रशियाच्या भूमिकेबाबत फेसबुकची चौकशी सुरू आहे. यातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. सध्या फेसबुकचे २०७ कोटी युझर्स असण्याची शक्यता आहे. त्यातील जवळपास २७ कोटी अकाउंट बनावट असण्याची शक्यता आहे.
एका संस्थेने दिलेल्या अंदाजानुसार, बनावट अकाउंटबाबत समोर आलेल्या आकडेवारीपेक्षा कित्येक पटींनी ही आकडेवारी जास्त आहे. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात बनावट अकाउंट कशी काय? ती कोणी तयार केली? आणि आता त्या अकाउंटचे काय होणार हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही.