Placeholder canvas
Thursday, May 2, 2024
Homeदेश३१ उपग्रहांसह ‘पीएसएलव्ही सी-४०’ अंतराळात झेपावले!

३१ उपग्रहांसह ‘पीएसएलव्ही सी-४०’ अंतराळात झेपावले!

श्रीहरीकोटा: भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने अर्थात इस्रोने शुक्रवारी नवा इतिहास रचला. इस्रोचे पीएसएलव्ही सी- ४० हे प्रक्षेपक ३१ उपग्रहांसह अंतराळात झेपावले. यात तीन भारतीय तर २८ विदेशी उपग्रहांचा समावेश आहे. अवकाशात झेपावलेले इस्रोचे हे शंभरावे उपग्रह आहे. श्रीहरीकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटर येथून या उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण झाले.

शुक्रवारी सकाळी ९ वाजून २९ मिनिटांनी ‘पीएसएलव्ही सी- ४०’ हे प्रक्षेपक ३१ उपग्रहांसह अवकाशात झेपावले आणि या मोहीमेची इस्रोच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंद झाली. ३१ उपग्रहांमध्ये यात भारताच्या तीन उपग्रहांचा समावेश आहे. ‘कार्टोसॅट-२’ या उपग्रहाचाही समावेश आहे. अंतराळातील भारताचा डोळा म्हणून या उपग्रहाकडे बघितले जाते. पृथ्वीवरच्या घडामोडींकडे लक्ष ठेवण्यासाठी हे उपग्रह महत्त्वाचे आहे. याशिवाय फ्रान्स, फिनलँड, कॅनडा, अमेरिका, दक्षिण कोरिया, युरोप या देशांचे उपग्रहदेखील अवकाशात सोडण्यात आले. अमेरिकेचे सर्वाधिक १९ तर दक्षिण कोरियाचे ५ उपग्रह अवकाशात सोडण्यात आले आहेत. तर फिनलँड, कॅनडा आदी देशांच्या प्रत्येकी एका उपग्रहाचा यात समावेश आहे. ‘पीएसएलव्ही सी- ४०’ या प्रक्षेपकाचे ४२ वे उड्डाण होते.

गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये इस्रोला अपयशाचा सामना करावा लागला होता. दिशादर्शक उपग्रहाच्या प्रक्षेपणानंतर त्यात तांत्रिक बिघाड झाल्याने इस्रोची मोहीम फत्ते होऊ शकली नव्हती. त्यानंतर इस्रोची ही पहिलीच मोहीम होती. २०१८ मधील ही पहिली मोहीम यशस्वी झाल्याने ‘इस्रो’वर शुभेच्छांचा वर्षाव सुरु झाला आहे. इस्रोने १९९९ पासून व्यावसायिक शाखेच्या मदतीने परदेशी उपग्रह अवकाशात सोडण्याचा कार्यक्रम सुरू केला होता. २०१६ मध्ये इस्रोने इतर देशांचे २२ उपग्रह प्रक्षेपित केले होते. मार्च २०१७ मध्ये इस्रोने एकाचवेळी ७ देशांचे १०४ उपग्रह अवकाशात सोडत रशियाचा विक्रम मोडीत काढला होता. याआधी रशियाने एकाचवेळी ३७ उपग्रह अवकाशात सोडण्याची किमया साधली होती. रशियाचा हाच विक्रम इस्रोने मोडला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments