Monday, May 20, 2024
Homeदेशहोय आमच्या विरोधात नाराजी आहे ! अमित शहांची कबुली

होय आमच्या विरोधात नाराजी आहे ! अमित शहांची कबुली

नवी दिल्ली: गुजरातमध्ये होत असलेल्या निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचारसभांचा धडाका लावला आहे. सभेत केलेल्या त्यांच्या भाषणातील मुद्दांप्रमाणेच रिकाम्या खुर्च्यांचीही चर्चा व्हायला लागली आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी पहिल्यांदाच जाहीरपणे कबुली दिली आहे की भाजपच्या विरोधात लोकांच्या मनात नाराजी आहे. एका मुलाखतीमध्ये त्यांनी ही कबुली दिली आहे.

पत्रकाराने अमित शहा यांना मुलाखतीदरम्यान प्रश्न विचारला होता की अनेक वर्ष सत्तेत असल्यानंतर नाराजीचा सामना करावा लागतो, याचा भाजप कसा मुकाबला करणार आहे. यावर उत्तर देताना शहा म्हणाले की मी मान्य करतो की सत्तेच्या विरोधात लोकांची नाराजी आहे, गेली अनेक वर्ष सत्तेत राहील्यानंतर ही नाराजीची लाट येणं ही स्वाभाविक गोष्ट आहे. मात्र आम्ही गुजरातेत विकास केला आहे, आश्वासनं पूर्ण केली आहेत आणि यामुळेच आमची व्होट बँक शाबूत राहील असं अमित शहांचं म्हणणं आहे.

अमित शहा यांना या मुलाखतीमध्ये पटेल समाजाच्या आंदोलनाबाबत, हार्दिक पटेल आणि काँग्रेसने उभ्या केलेल्या आव्हानाबाबतही विचारण्यात आलं , यावर ते म्हणाले की आरक्षणासाठीचं आंदोलन हे काँग्रेस पुरस्कृत होतं आणि आता आरक्षणाबाबत कोणीच बोलायला तयार नाही. त्यामुळे हा मुद्दाच नाही आणि पटेल समाज हा भाजपच्याच मागे उभा आहे असा दावा शहांनी केला आहे. काँग्रेसने ‘विकास वेडा झाला आहे’ अशी मोहीम सुरू केली आहे, या मोहीमेमुळे राहुल गांधी विकासालाच नावं ठेवत असल्याची टीका अमित शहांनी केली आहे.

काही दिवसांपूर्वीच गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांची एक ऑडीयो क्लिप व्हायरल झाली होती, ज्यात त्यांनी म्हटलं होतं की माझी अवस्था खराब आहे. या क्लिपनंतर अमित शहांनी मुलाखतीमध्ये आमच्याविरोधात नाराजी आहे हे सांगितल्याने, गुजरातमध्ये भाजप काहीशी चिंतेत पडल्याची चर्चा सुरू झाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments