Placeholder canvas
Friday, May 3, 2024
Homeदेशपंतप्रधान मोदी मला इंटरव्ह्यू देत नाहीत- रवीश कुमार

पंतप्रधान मोदी मला इंटरव्ह्यू देत नाहीत- रवीश कुमार

मुंबई : काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काही न्यूज चॅनल्सला मुलाखत दिली होती. त्यांची ही मुलाखत सोशल मीडियावर विविध कारणांमुळे बरीच चर्चेत होती. पंतप्रधान मोदी केवळ आपल्या आवडीचे चॅनल्स आणि पत्रकारांना मुलाखत देतात अशी चर्चा सोशल मीडियावर होती. मोदी एनडीटीव्हीच्या रवीश कुमार यांना इंटरव्ह्यू का नाही देत? मोदी रवीश कुमार यांच्या प्रश्नांना घाबरतात का ? यावर देखील सोशल मीडियावर जोरदार चर्चा झाली.

दरम्यान, स्वतः रवीश कुमार यांनी याबाबत आता प्रतिक्रिया दिली आहे.  पंतप्रधान मोदी तुम्हाला मुलाखत का देत नाहीत? असा प्रश्न हिंदी न्यूज चॅनल कशिश टीव्हीच्या एका कार्यक्रमात रवीश कुमार यांना विचारण्यात आला. उत्तर देताना रवीश कुमार म्हणाले, ”कदाचित पंतप्रधान मोदी माझ्या प्रश्नांना घाबरतात. जेव्हा ते माझ्या समोर असतील मी त्यांचं प्रवचन ऐकत बसणार नाही. भजी कुठे-कुठे विकली जातात? कुठे २०० रूपयांना भजी मिळतात? असं काहीही मी अजिबात ऐकून घेणार नाही. मी त्यांना प्रतिप्रश्न करणारच, त्यांना प्रश्न विचारणं म्हणजे त्यांचा अनादर करणं नव्हे”.
”मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत. त्यांची एकहाती सत्ता आहे, जर सरकार त्यांचं आहे तर प्रश्न देखील त्यांनाच विचारले जाणार. पण सध्या परिस्थिती वेगळी आहे. ९९% मीडियाने सध्या गुडघे टेकले आहेत. त्यामुळे जेव्हा एखादाच कोणी प्रश्न विचारतो तर त्याला मोदीविरोधी म्हटलं जातं. पण मी त्यांना विचारतोय की मोदीजी तुम्ही रवीश विरोधी का आहात ? दोन वर्षांपासून तुम्ही तुमच्या पक्षाच्या प्रवक्त्यांना माझ्या कार्यक्रमात पाठवणं बंद केलं आहे. मग नक्की विरोध कोण करतंय? मी विरोध करतोय की भाजपा माझा विरोध करतंय? भाजपाला विचारायला हवं की ते माझा तिरस्कार करतात की खरंच माझ्या प्रश्नांना घाबरतात. मला वाटतं त्यांना माझ्या प्रश्नांची उत्तरं देता येत नाहीत. २०१४ पर्यंत तर मला फोन करून कार्यक्रमात बोलावलं जायचं, मग आता काय झालं ?
रवीश कुमार हे अनेकदा सोशल मीडियावर भाजपाच्या समर्थकांकडून ट्रोल होत असतात, ट्रोल करणारे समर्थक त्यांना भाजपा आणि मोदीविरोधी म्हणतात. यापूर्वी एनडीटीव्ही चॅनलवर केंद्र सरकारने बंदी आणली होती तेव्हादेखील रवीश कुमार यांनी भाजपा आणि मोदी सरकारवर संताप व्यक्त केला होता, तेव्हाही त्यांनी मोदींना इंटरव्ह्यूचं एकप्रकारे थेट आव्हान दिलं होतं.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments