Placeholder canvas
Thursday, May 2, 2024
Homeदेशदलित समाज २०१९ च्या निवडणुकीत तुम्हाला धडा शिकवेल - जिग्नेश मेवाणी

दलित समाज २०१९ च्या निवडणुकीत तुम्हाला धडा शिकवेल – जिग्नेश मेवाणी

नवी दिल्ली: माझ्या भाषणातील एक शब्दही प्रक्षोभक नव्हता. मात्र, तरीही भीमा कोरेगाव हिंसाचारानंतर मला आणि दलित समाजाला जाणूनबुजून लक्ष्य करण्यात येत आहे. हा प्रकार असाच सुरू राहिला तर दलित समाज २०१९ च्या निवडणुकीत तुम्हाला चांगला धडा शिकवेल, अशा इशारा मेवाणी यांनी दिला.

पुण्यातील शनिवार वाडा येथे चिथावणीखोर भाषण केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आलेले आमदार जिग्नेश मेवाणी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधान मोदी यांच्यावर आगपाखड केली. माझ्या भाषणातील एक शब्दही प्रक्षोभक नव्हता. मात्र, तरीही भीमा कोरेगाव हिंसाचारानंतर मला आणि दलित समाजाला जाणूनबुजून लक्ष्य करण्यात येत आहे. हा प्रकार असाच सुरू राहिला तर दलित समाज २०१९ च्या निवडणुकीत तुम्हाला चांगला धडा शिकवेल, अशा इशारा मेवाणी यांनी दिला. याशिवाय, मला एकदा पंतप्रधानांना भेटायचे आहे. त्यांना भेटायला जाताना मी मनुस्मृती आणि संविधानाची प्रत घेऊन जाईन. या दोन्ही गोष्टी पंतप्रधानांसमोर ठेवल्यानंतर ते मनुस्मृती आणि संविधान यापैकी काय निवडतात, हे मला पाहायचे असल्याचे जिग्नेश यांनी सांगितले.

याशिवाय, मी कधीही भीमा कोरेगावला गेलो नसल्याचे जिग्नेश यांनी स्पष्ट केले. मात्र, पंतप्रधान मोदी अजूनही भीमा कोरेगावच्या मुद्द्यावर मौन बाळगून का आहेत, असा सवाल त्यांनी विचारला. मोदी पंतप्रधानपदी आल्यापासूनच देशामध्ये दलितांवरील अत्याचारांमध्ये वाढ झाली आहे. त्यांचे गुजरात मॉडेल हे शेतकरी आणि मजुरांना लक्ष्य करणारे असल्याचे त्यांनी म्हटले. सध्या संघ परिवार आणि भाजपाचे लोक बालिश आरोप करून माझी प्रतिमा मलिन करायचा प्रयत्न करत आहेत. गुजरातमधील निकालामुळे हे घडत आहे. त्यामुळे कदाचित त्यांना २०१९ सालच्या लोकसभा निवडणुकांची भीती वाटत असावी, असा टोलाही जिग्नेश यांनी सरकारला लगावला.

३१ डिसेंबर रोजी शनिवार वाड्याच्या इथे एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उमर खालिद व जिग्नेश मेवाणी सहभागी झाले होते. उमरने भीमा कोरगाव लढाईला भविष्यात पुन्हा निर्माण करू शकतो अशा आशयाचे वक्तव्य केल्याचा आरोप आहे. तसेच, नवीन पेशवाईला संपवणे हीच भीमा कोरेगावच्या शहिदांना श्रद्धांजली ठरेल असेही उमर म्हणाल्याची फिर्याद आहे. यावेळी बोलताना जिग्नेश मेवाणी याने हा संघर्ष पुढे न्यायचा असेल तर केवळ निवडणुकांचे राजकारण पुरेसे नाही, विधानसभेत व संसदेत तर जनतेची लढाई लढणारे हवेतच मात्र, जातिनिर्मूलनाची लढाई रस्त्यावरच करावी लागेल असे वक्तव्य केल्याची फिर्याद आहे. एका वर्गाचं दुसऱ्या वर्गावर शासन असून ते रस्त्यावरच्या लढाईतच संपुष्टात येईल, असे जिग्नेश म्हणाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments