Placeholder canvas
Sunday, May 5, 2024
Homeदेशगोमूत्रापासून औषधे तयार करण्याची उत्तर प्रदेश सरकारची योजना

गोमूत्रापासून औषधे तयार करण्याची उत्तर प्रदेश सरकारची योजना

लखनौ: उत्तर प्रदेश सरकारने गोमूत्रापासून औषधे तयार करण्याची योजना आखली असून त्याला उत्तेजनही दिले जाणार आहे. तेथील आयुर्वेद खात्याचे संचालक डॉ. आर.आर.चौधरी यांनी सांगितले, की  आमच्या विभागाने गोमूत्रापासून आठ औषधे बनवली असून ती यकृत आजार, सांधेदुखी, प्रतिकारशक्तीची कमतरता यावर उपयुक्त आहेत. राज्यातील आयुर्वेद विभागाचे लखनौ व पीलभीत येथे दोन औषध प्रकल्प असून तेथे गोमूत्र, गाईचे दूध, तूप यापासून औषधे तयार केली जातात.

राज्यात बांदा, झांसी, मुझफ्फरनगर, अलाहाबाद, वाराणसी,बरेली, लखनौ व पीलभित येथे आठ आयुर्वेद वैद्यकीय महाविद्यालये आहेत. तेथे आयुर्वेदातील पदवी दिली जाते. तेथे हजारो रूग्ण रोज उपचारासाठी येत असतात. लखनौ येथे आयुर्वेद रूग्णालयाच्या ओपीडीमध्ये रोज सातशे ते आठशे रूग्ण येतात. जर आठ रूग्णालयांची संख्या एकत्र केली तर रोज हजारो रूग्ण उपचारासाठी या रूग्णालयांमध्ये येतात. चौधरी यांनी सांगितले, की गोमूत्र हा आयुर्वेदाचा एकात्म भाग आहे, गाईपासूनची इतर उत्पादनेही उपयोगी आहेत. सध्या आम्ही यकृत आजार, सांधेदुखी, प्रतिकारशक्तीची कमतरता  यावर गोमूत्रावर आधारित औषधे देतो. आता त्यांचा वापर विस्तारण्याचा विचार आहे.

उत्तर प्रदेशात दोनच औषध प्रकल्प ही औषधे तयार करतात त्यामुळे त्यांची संख्या वाढवण्यात येईल. या दोनच सरकारी कंपन्या आहेत, पण गोमूत्रापासून औषधे तयार करणाऱ्या खासगी कंपन्या अनेक आहेत. आयुर्वेद महाविद्यालयात पदव्युत्तर शिक्षणही चालू करण्याचा विचार आहे. गेल्या ऑगस्टमध्ये मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी सरकारी कचेऱ्यात स्वच्छतेसाठी गोमूत्रावर आधारित र्निजतुक औषधांचा वापर करण्याचा आदेश दिला होता.

विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री हर्षवर्धन यांनी याबाबत निवडक प्रकल्पांसाठी समिती नेमली असून त्यात पंचगव्यातील शेण, गोमूत्र,  तूप,दूध व दही यांचे उपयोग व फायदे शोधून काढण्यास सांगण्यात आले आहे. विज्ञान भारती, गोविज्ञान अनुसंधान केंद्र या संस्थांचा त्यात सहभाग आहे. वैज्ञानिक रघुनाथ माशेलकर, आयआयटी दिल्लीचे संचालक प्रा. रामगोपाल राव व प्रा. व्ही.के. विजय यांचा समितीत समावेश आहे. विज्ञान भारतीचे अध्यक्ष विजय भटकर हे समितीचे सहअध्यक्ष आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments