नवी दिल्ली:- सुप्रीम कोर्टाने या दिवाळीमध्ये दिल्ली आणि आसपासच्या भागात (एनसीआर) फटाके विक्रीवर १ नोव्हेंबर पर्यंत बंदी घातली आहे. कोर्टाने गेल्यावर्षीचा आपला आदेश पुन्हा लागू केला आहे. गेल्या वर्षी दिवाळीनंतर ११ नोव्हेंबर रोजी दिल्ली-एनसीआरमध्ये फटाके विक्रीवर सुप्रीम कोर्टाने बंदी घातली होती, मात्र १२ सप्टेंबर रोजी काही अटींसह ही बंदी उठवण्यात आली होती. त्यानंतर एका याचिकेद्वारे ही बंदी उठवण्याची मागणी करण्यात आली होती.
प्रदुषणामुळे बंदी
– दिल्ली-एनसीआरमध्ये दिवसेंदिवस प्रदुषणाच्या पातळीत वाढ होत आहे. यामुळे सुप्रीम कोर्टाने येथे फटाके विक्रीवर बंदी घातली होती.
– गेल्या महिन्यात फटाके विक्रीवरील बंदी उठवल्यानंतर अर्जुन गोपाळ यांनी त्याविरोधात याचिका दाखल केली होती.
– गोपाळ यांचे म्हणणे आहे की गेल्यावर्षी दिवाळीनंतर दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रदुषण झाले होते.
CPCB नेही केली होती बंदी मागणी
– केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळ (CPCB) यांनी दिवाळीमध्ये फटाका विक्रीवर बंदी घालण्याचे समर्थन केले होते.
– फटाके विक्रीचा परवाना असलेल्या परवानाधारकांनी कोर्टाच्या या निर्णयाला विरोध दर्शवला होता. त्यांचे म्हणणे होते की फटाका विक्री बंदीचा निर्णय एकतर्फी होता. कोर्टाने सर्व पक्षांची बाजू एकूनही घेतली नव्हती.
या अटींवर कोर्टाने उठवली होती बंदी
– फटाका विक्रीचे परवाने पोलिसांच्या देखरेखीत दिले जावे.
-२०१६ मध्ये जेवढे परवाने देण्यात आले त्याच्या ५०% यंदा देण्यात यावे.
– सायलेन्स झोनच्या (हॉस्पिटल, कोर्ट, धार्मिक स्थळ आणि शाळा महाविद्यालय) यांच्या १०० मीटर अंतरात फटाके वाजवू नये.
– फटाके निर्मितीत लिथियम, लेड, पारा, अँटीमोनी आणि आर्सेनिक यांचा वापर होऊ नये.
– पुढील आदेशापर्यंत दिल्ली-एनसीआरमध्ये दुसऱ्या राज्यातून फटाके आणू नये.
– यंद्याच्या दिवाळीसाठी दिल्ली-एनसीआरमध्ये ५० लाख फटाके पुरेसे आहेत.