लिंग बदलाची शस्त्रक्रिया करून पुरुषाची महीला झालेल्या एका नौदल अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. मनीष गिरी असे त्या नौदल अधिकाऱ्याचे नाव असून तो आयएनएस ईकसीलावर कमांडींग ऑफिसर म्हणून कार्यरत होता. मनीषने भरतीच्या नियमांचे उल्लंघन केल्याने संरक्षण मंत्रालयाने त्याच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. नौदलात नाविक पदावर फक्त पुरूषांची भरती केली जात असल्याने त्याला निलंबीत केल्याचे समजते.
मनीष गिरी २०११ ला ईस्टर्न नेव्हल कमांडच्या मरीन इंजिनियरिंग विभागात नाविक म्हणून भरती झाला होता. सध्या तो नौदलाच्या विशाखापट्टनम येथील तळावर आयएनएस ईकसीलावर कार्यरत होता. मनीषने ऑगस्ट महीन्यात दिल्लीतील एका रुग्णालयात लिंग बदलाची शस्त्रक्रीया केली. या शस्त्रक्रियेनंतर त्याने स्वत:चे नाव बदलून साबी असे ठेवले आहे.
“ऑगस्ट महीन्यात मनीष २२ दिवसांसाठी रजेवर गेला होता. त्या रजेदरम्याम त्याने दिल्लीतील एका रुग्णालयात लिंग बदलाची शस्त्रक्रिया केली. त्यानंतर मनीष जेव्हा पुन्हा कामावर रुजू झाला त्यावेळी त्याने महिलांसारखे केस वाढवले होते. तो साडीही नेसू लागला होता. त्याचे ते रुप बघून आम्हाला धक्का बसला होता. मनीषने भरतीच्यावेळी स्वत:चा उल्लेख पुरूष असा केला होता. त्याच्या या लिंग बदलामुळे भरतीच्या नियमांचे उल्लंघन झाले असून त्याबाबत आम्ही संरक्षण मंत्रालयाला कळविले होते. संरक्षण मंत्रालयाने त्याला निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत.” अशी माहिती नौदलाच्या एका अधिकाऱ्याने दिली.
मी गेले वर्षभर मानसिक तणावातून जातोय. माझ्यात होणाऱ्या बदलांविषयी मी वेळोवेळी वरिष्ट अधिकाऱ्यांना सांगितले पण त्यांनी कायम मला मानसोपचार तज्ज्ञांकडे जाण्याचा सल्ला दिला. नौदलात १८ -१९ व्या वर्षी तरुण भरती होतात, त्यानंतर जर त्यांच्यात काही बदल होत असतील तर त्यांना समजून घेणे गरजेचे आहे.
– मनीष गिरी उर्फ साबी