हैदराबाद: काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी हे २०१९ च्या निवडणुकीत देशाचा चेहरा असतील आणि ते पंतप्रधानही होतील, असे भाकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वीरप्पा मोईली यांनी वर्तविले आहे. ते शुक्रवारी हैदराबाद येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वाविषयी विश्वास व्यक्त करत त्यांच्यामुळेच गुजरात विधानसभेच्या निवडणुकीत पक्षाला मोठे यश मिळण्याची अपेक्षा असल्याचे म्हटले. काँग्रेस पक्ष लवकरच पश्चिमेकडील राज्यांमध्ये सत्ता प्रस्थापित करेल. राहुल गांधींनी गुजरातमध्ये गांभीर्याने लक्ष घातले असून ते खूप मेहनतीने दौरे करत आहेत. त्यांच्यामुळे पक्षातील कार्यकर्त्यांना नवा हुरूप आला आहे, असे मोईली यांनी सांगितले.
मात्र, यावेळी मोईली यांनी राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्षपद कधी स्वीकारणार, याबाबत स्पष्टपणे बोलण्यास नकार दिला. राहुल यांच्या अध्यक्षपदाच्या राज्यभिषेकाबाबत सध्या अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी राहुल काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, त्याबद्दल आत्ताच ठोस काही सांगता येणार नाही. या सगळ्याची एक प्रक्रिया असते, असे मोईली यांनी म्हटले. राहुल गांधी यांच्याकडे अध्यक्षपदाची सूत्रे देण्यात विलंब होतोय, असे पक्षातील प्रत्येकालाच वाटत आहे. परंतु, ते सध्या संघटनात्मक निवडणुकांची वाट पाहत आहेत. या निवडणुकांच्या माध्यमातूनच त्यांना अध्यक्षपदी निवडून यायचे आहे, असे मोईली यांनी सांगितले.