नवी दिल्ली : बलात्कारप्रकरणी दोषी असलेला राम रहिम गुरमित २० वर्षे तुरूंगात शिक्षा भोगत आहे. त्याला कोर्टातर्फे दंडही सुनावण्यात आला आहे. याप्रकरणी गुरमितच्या वकिलांनी पंजाब हरियाणा हायकोर्टात अर्ज दाखल केला आहे.
पंचकुला न्यायालयाने राम रहीम याला दोषी ठरवले होते आणि त्याच्यावर दंड ठोठावला होता. सोमवारी सुनावणीच्या वेळी डेरा प्रमुखाचा अॅड. एस. के. गर्ग नरवाना यांनी सांगितले की, सीबीआय न्यायालयाने डेरा प्रमुखाविरोधात ३० लाख २० हजार रुपये दंड ठोठावला आहे.
राम रहिमच्या वकिलाने कोर्टात सांगितले की, राम रहिमने संसारीक विषयांचा त्याग केला आहे. मग एवढी रक्कम कशी भरणार ? त्यावर, न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती सुधीर मित्तल यांच्या खंडपीठाने राम रहीम यांच्या वकिलाला दोन महिन्यांच्या आत ३० लाख रुपयांचा दंड भरण्याचा आदेश दिला. न्यायालयाने सांगितले की, “डेरा प्रमुखांची काही मालमत्ता आणि बँक खाती आहेत, त्यातून दंड भरला जाऊ शकतो.” बाबाचा निधी साध्वींना तूर्तास देण्यास बंदी घालत दोन महिन्यांच्या आत दंडाची रक्कम सीबीआय न्यायालयात जमा करण्याचे आदेश दिले. दंडाची ही रक्कम कोणत्याही सरकारी बॅंकेत एफडी करण्यास सांगितले गेले आहे.
जर राम रहिमची अपील स्वीकारली तर ती रक्कम त्याला परत केली जाईल परंतु जर राम रहीमची अपील फेटाळली तर ती रक्कम साध्वींना दिली जाईल असेही न्यायालयाने स्पष्ट केले. दरम्यान सीबीआयतर्फे यावर आक्षेपही घेण्यात आला. साध्वींचे वकीलही त्यास विरोध करत होते. पंचकूला विशेष सीबीआय न्यायालयाने दोन साध्विंच्या लैंगिक शोषणासाठी गुरुमीत राम रहीम याला २० वर्षे तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे.