नवी दिल्ली : देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी ३१ टक्के मुंबईकर तणावाखाली जीवन जगत असल्याचं एका संशोधनातून समोर आलं आहे. लीब्रेट या डॉक्टरांच्या ऑनलाईन सल्लागार संस्थेनं हा सर्व्हे केला आहे. तसेच संपूर्ण देशातल्या महत्त्वाच्या शहरांमधील ६० टक्के नागरीक हे तणावाखाली जगत असल्याचही यात म्हटलं आहे.
यामध्ये दिल्ली (२७ टक्के), बंगळुरु (१४ टक्के), हैदराबाद (११टक्के), चेन्नई (१० टक्के), कोलकत्ता (७ टक्के) इतकं प्रमाण आहे. या सर्वेनुसार, मुंबईतल्या नोकरदार वर्गातील व्यक्तींचं तणावाचं मुख्य कारण अपूरा वेळ, दिलेलं काम वेळेत पूर्ण करु न शकणं, मानसिक तणावाशी संघर्ष, ऑफिसमधील राजकारण, ओव्हर टाईम काम करणं, तसेच, प्रोफेशनल जीवन आणि वैयक्तीक जीवनात योग्य संतुलन नसल्याची मुख्य कारणं आहेत. लीब्रेट संस्थेचे सीईओ आणि संस्थापक सौरभ अरोडा यांनी याबाबत सांगितलं की, “तणावाखालील व्यक्तींना आपल्या कुटुंबाशी आणि मित्रांशी बोलताना नेहमी अस्वस्थता जाणवते. पण आरोग्याच्या दृष्टीनं त्यांनी आपले विचार, आपल्या भावना इतरांसमोर व्यक्त करणं गरजेचं आहे.”
अरोडा पुढे म्हणाले की, “तणावाखालील व्यक्तींना त्या मागचं नेमकं कारण समजणं गरजेचं आहे. ज्यामुळे त्याचा परिणाम कमी करण्यासाठी उपाय करता येतील. अन्यथा प्रदीर्घ काळ तणावाखाली राहिल्याने त्याला आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात.” संशोधनानुसार, मीडिया आणि जनसंपर्क क्षेत्रातील २२ टक्के, बीपीओ १७ टक्के, ट्रॅव्हल्स अँड टूरिझम ९ टक्के, आणि जाहिरात तसेच इव्हेंट मॅनेजमेंट क्षेत्रातील ८ टक्के व्यक्ती तणावाखाली जीवन जगत आहेत. तर सेल्स आणि मार्केटिंग क्षेत्रातील सर्वाधिक २४ टक्के व्यक्ती तणावाखाली जगत असल्याचा दावा या संशोधनातून केला आहे.
हा सर्व्हे १० ऑक्टोबर २०१६ पासून १२ महिन्याच्या कालावधीत करण्यात आला. यावेळी डॉक्टरांच्या एका टीमने जवळपास एक लाखापेक्षा जास्त नोकरी करणाऱ्या व्यक्तींशी चर्चा केली. त्या चर्चेतून हा निष्कर्ष काढला आहे.