पाटना: भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचे चिरंजीव जय शहांच्या कंपनीतील कोट्यवधीच्या उलाढालीमुळे भाजपच्या प्रतिमेला धक्का बसला आहे, असं सांगतानाच, या प्रकरणात जय शहा यांची पाठराखण करणारे रेल्वेमंत्री पीयूष गोयल हे जय यांच्या कंपनीचे सीए आहेत काय? असा संतप्त सवाल भाजपचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी केला आहे.
जय शहा यांच्या संपत्तीत १६ हजारपट वाढ झाल्याचं उघडकीस आल्यानंतर त्यांच्यावर चहूबाजूने टीका होत असतानाच यशवंत सिन्हा यांनीही या वादात उडी घेत स्वपक्षाच्या नेत्यांवर हल्ला चढविला आहे. जय यांची पोलखोल केल्यामुळे ‘द वायर’ या संकेतस्थळावर अब्रुनुकसानीचा दावा करणं मीडिया आणि देशाच्या हिताचं नाही. सरकारनं या प्रकरणाची पूर्ण चौकशी करायला हवी, अशी मागणी सिन्हा यांनी केली.
भ्रष्टाचारावर झिरो टॉलरन्सच्या गप्पा मारणाऱ्या भाजपनं नैतिकता गमावली आहे. अतिरिक्त महाधिवक्त्यानंही या प्रकरणावर चौकशीआधीच घाईघाईत मत मांडलं. यापूर्वी असं कधी झालं नव्हतं, असं सांगतानाच पीयूष गोयल ज्या पद्धतीने जयची बाजू मांडत आहेत, त्यावरून असं वाटतयं की ते जयचे सीएच असावेत, असा टोलाही त्यांनी लगावला. नोटाबंदीवरून भाजपवर टीका करणाऱ्या सिन्हा यांनी आता थेट पक्ष अध्यक्षाच्या मुलावरच टीका केल्याने भाजपमध्ये खळबळ उडाली आहे.