नवी दिल्ली : भाजपने गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाला पत्र लिहून एक सल्ला दिला आहे. गुजरातमध्ये १४ डिसेंबर ते १४ जानेवारी या काळात निवडणूक घेण्याबाबत विचार करावा, असा सल्ला भाजपने निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रात दिला आहे.
हा लग्नसराईचा मोसम नसतो किंवा या काळात सणही जास्त नसतात. त्यामुळे मतदार जास्त प्रमाणात सहभागी होतील, असं भाजपने म्हटलं आहे. शिवाय राजकीय पक्षांचे प्रचार कार्यालयं आणि मतदान केंद्र यांमधील अंतर कमी करावं, अशी मागणीही भाजपने केली आहे. भाजपचे लीगल सेल प्रभारी परींदु भगत आणि प्रशासकीय प्रभारी कौशिक पटेल यांच्या वतीने निवडणूक आयोगाला हे पत्र देण्यात आलं आहे.
१४डिसेंबर ते १४ जानेवारी या काळात लग्नसराई नसते. हा काळ हिंदू धर्मात अशुभ मानला जातो. तर १० डिसेंबर ते १४ डिसेंबर या काळात सर्वात जास्त लग्न होतात. हे लक्षात घेता १४ डिसेंबर ते १४ जानेवारी या काळात निवडणूक घ्यावी. सर्व पक्ष, उमेदवार आणि मतदारांसाठी ही तारीख योग्य राहिल, असं भाजपने म्हटलं आहे.
निवडणूक ही उत्सवाप्रमाणे साजरी केली पाहिजे. त्यामुळे यामध्ये सर्वांनी सहभाग घेणं गरजेचं आहे, असं म्हणत भाजपने सर्व पक्षांची बैठक घेण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे.