पाणी आपण पितोच. ते जीवनावश्यक. पण जेवायला जसं आपल्याला शिकवण्यात आलं तसं पाणी प्यायचं काही कुणी शिकवत नाही. तोंडाला भांडं लावून आपण घटाघटा पाणी पितोच. पण चुकीच्या रीतीनं पाणी प्यायल्यामुळे शरीराला अपाय होवू शकतो असं आता आरोग्य अभ्यासक म्हणत आहेत. साधारण पाणी पिताना काही चुका सर्रास केल्या जातात किंवा होतात. त्या टाळाव्यात असं सांगणारे काही अभ्यास अलिकडेच प्रसिद्ध झाले आहेत.
त्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट. जी आजवर आपल्या घरातली वडीलधारी माणसं सांगत होतीच. ते म्हणजे बाहेरुन आल्यावर, टळटळीत उन्हातून आल्यावर लगेच पाणी पिऊ नये. दुसरं म्हणजे उभं राहून, भांडय़ाला तोंड न लावता वरुन पाणी पिऊ नये. उभ्यानं पाणी प्यायल्यास अपचनाचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे कायम बसूनच पाणी प्यावे. बसून पाणी प्याल्यानं मृतपिंडाचे कामही सुरळीत चालते असा अभ्यास म्हणतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे अलिकडचा अत्यंत महत्वाचा प्रश्न. पाणी किती प्यावं. सकाळी उठल्याउठल्या पाणी प्यावं का? तर त्याचं उत्तर म्हणजे तहान लागली तरच पाणी प्यावं. वाटलं म्हणून, प्यायचंच म्हणून पाणी पिऊ नये. पाणी पितानाही ते ही एकदम घटाघटा पाणी न पिता, थोडं थोडं पाणी हळू हळू प्यावं. खूप घटाघटा पाणी प्यायल्यानं मन भरत नाही. तहान भागल्यासारखं वाटत नाही. त्यामुळे आपण जास्त पाणी पितो. त्यानं पोटात डब्ब झाल्यासारखं वाटतं. म्हणून सावकाश बसून पाणी पिणं उत्तम.