कंबरदुखी समस्येने बरेच लोक त्रस्त झाले आहेत. कंबरदुखीचे दुखणे हे हलके, मध्यम वा तीव्र अशा स्वरुपाचे असू शकते, जे सतत आवळल्याप्रमाणे, घट्ट धरुन ठेवल्यासारखे, खेचल्याप्रमाणे वा ताणल्याप्रमाणे किंवा भोसकल्याप्रमाणे अशा वेगवेगळ्या स्वरुपाचे असू शकते. वेदना सुद्धा एकाच जागी होणारी, एकाच जागी सुरु होऊन त्या जागेच्या सभोवताली पसरणारी, एका जागेवरुन सुरु होऊन संबंधित नसेच्या मार्गामध्ये पसरणारी, जसे कंबरेपासुन सुरु होऊन गुडघ्यापर्यंत जाणारी अशी असू शकते.
जेव्हा कंबरेचे स्नायू , नसा, सांधे(मणके), मणक्यांमधील गोलाकार कूर्चा(डिस्क)या अंगांमध्ये विकृती असते, तेव्हा ती तीव्र वा जुनाट अशा दोन्ही प्रकारची असू शकते. सर्वसाधारण कंबरेचे दुखणे हे तीन दिवसांमध्ये कमी झाले पाहिजे. अशावेळी ७२ तासांमध्ये कंबरदुखी कमी न झाल्यास तज्ज्ञ डॉक्टरांना दाखवावे. मात्र खेळताना, मार लागल्यामुळे, घसरुन पडल्यामुळे वा अपघातामुळे झालेल्या कंबरदुखीमध्ये रुग्णाला हलता सुद्धा येत नसेल तर मात्र ताबडतोब डॉक्टरांकडॆ न्यावे. रुग्णाने हालचाल केल्याने त्याची वेदना वाढत असल्यास हालचाल न करणे योग्य, अशावेळी रुग्णाला चादरीमध्ये झोपवून ती चादर चारही बाजूने उचलून डॉक्टरांकडे न्यावे किंवा डॉक्टरांना घरी बोलवावे. अपघातामुळे किंवा मार लागल्यामुळे होणार्या कंबरेच्या दुखण्याव्यतिरिक्त सर्वसाधारणपणे अचानक उद्भवलेले दुखणे सहसा लगेच बरे होते, असा अनुभव आहे, अर्थात हा काही नियम नाही. याऊलट जुनाट प्रकारची कंबरदुखी हा दीर्घकाळ पीडणारा त्रास आहे. साधारण तीन महिन्याहून अधिक काळ कंबरेचे दुखणे राहिल्यास त्याला जीर्ण कंबरदुखी होऊ शकते.