मुंबई : गोरेगाव येथील इटालियन इंडस्ट्रीयल इस्टेटला आज सकाळी भीषण आग लागली. आग अत्यंत भीषण असून सुदैवाने आगीत अडकलेल्या १५ जणांना वाचविण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र आग वेगाने पसरत असल्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन जवानांना अडचणी येत आहेत. गोरेगावमधील ओबेरॉय मॉलच्या परिसरात ही इटालियन इंडस्ट्रीयल इस्टेट आहे. हे कपडे बनविण्याचे गोदाम असून त्याला आज सकाळी आग लागली.
कपड्यांनी भराभर पेट घेतल्याने आग वेगाने पसरत गेली आणि आगीने उग्ररूप धारण केले. त्यामुळे आजूबाजूच्या लोकांची एकच धावपळ उडाली. स्थानिकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात त्यांना यश आले नाही. त्यानंतर घटनास्थळी अग्निशमन दलाच्या आठ गाड्या दाखल झाल्या. अग्निशमन दलाचे जवान आठ फायर इंजिन आणि सहा पाण्याच्या बंबाच्या सहाय्याने आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. मात्र, आग मोठी असल्याने त्यावर नियंत्रण मिळवण्यात अडचणी येत आहेत. या आगीत इंडस्ट्रीयल इस्टेटमधील दोन गोदामे जळून खाक झाली असून सुदैवाने आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.