मुंबई – वांद्रे पश्चिममधील लकी हॉटेल मागे असलेल्या लज्जत ढाब्याला दुपारी एक वाजताच्या दरम्यान भीषण आग लागली. ढाब्याला लागलेल्या आगीने काही क्षणात पत्र्याच्या शेडला घेरले. त्यामुळे पत्र्याच्या शेडमधून आगीचे मोठे लोट वर येत असल्याचे पाहायला मिळत होते. या आगीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
ढाब्याच्या बाजूला असलेल्या हॉटेलमध्ये आग पसरण्याची दाट शक्यता होती. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करुन दोन वॉटर टँकरच्या सहाय्याने आग आटोक्यात आणली. वांद्रे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाचा पंचनामा केला. आग लागण्याचे कारण अद्याप अस्पष्ट असून तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.