Placeholder canvas
Sunday, May 5, 2024
Homeमहाराष्ट्रनाताळच्या मुहूर्तावर एसी लोकल धावणार !

नाताळच्या मुहूर्तावर एसी लोकल धावणार !

मुंबई : बहूचर्चित वातानुकूलित लोकल प्रत्यक्षात सेवेत येण्याची मुंबईकरांची प्रतीक्षा नाताळच्या दिवशी २५ डिसेंबरपासून संपुष्टात येणार आहे. वर्षभरापूर्वी मुंबईत आगमन झालेल्या या लोकलची पहिली फेरी दुपारी २.१० मिनिटांनी अंधेरी ते चर्चगेटपर्यंत धावणार आहे. रेल्वे मंत्रालयाने मुंबईकरांना नाताळची ही भेट दिली असून त्यामुळे भविष्यातील सर्वच लोकल एसीवर चालण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. भारतीय बनावटीच्या या एसी लोकलचे किमान तिकीट ६० रुपये असून कमाल भाडे २०० रुपये राहणार आहे. त्यात जीएसटी अंतर्भूत करण्यात आला आहे. 

दशकभराच्या प्रतीक्षेनंतर मुंबईकरांना वातानुकूलित लोकल प्रवासाची प्रत्यक्ष अनुभूती घेता येणार आहे. चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये (आयसीएफ) ही एसी लोकल तयार करण्यात आली आहे. रेल्वे बोर्डापाठोपाठ पश्चिम रेल्वेच्या मुख्य सुरक्षा आयुक्तांनी सुरक्षिततेबाबतचे प्रमाणपत्र दिल्यानंतर ही लोकल सेवेत येण्यावर शिक्कामोर्तब झाले. प्रीमियम दर्जाचा स्तर लाभलेल्या एसी लोकलचे प्रवासभाडे कमीत कमी ६० रुपये ते जास्तीत जास्त २०० रुपयांपर्यंत असेल. नाताळसोबतच माजी पंतप्रधान आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या लोकल सेवेचा मुहूर्त साधला जात आहे. ही लोकल विरार ते चर्चगेट जलद मार्गावर चालविली जाणार आहे. या लोकलला चर्चगेट ते मुंबई सेंट्रल, दादर, वांद्रे, अंधेरी, बोरिवली, भाईंदर, वसई, विरार असे थांबे देण्यात आले आहेत. ही लोकलसेवा यशस्वी झाल्यास आयसीएफने आणखी ११ एसी लोकल बनविण्याची तयारी दर्शविली आहे.

फर्स्ट क्लासपेक्षा १.३ पट जास्त भाडे
रेल्वे बोर्डाने एसी लोकलचे तिकीट फर्स्ट क्लासच्या किमान तिकिटाच्या १.३ पट जास्त असावे, असे श​निवारी स्पष्ट केले. एसी लोकल तिकिटांबाबत निर्णय जाहीर करताना त्यात पहिल्या सहा महिन्यांसाठी १० टक्के सवलतही देण्यात आली आहे. या तिकिटांवर पूर्वीच्या सेवाकराऐवजी लोकलच्या तिकीट, पासबाबत सूत्र मांडताना रेल्वे बोर्डाने त्यात जीएसटीही अंतर्भूत असेल, असे नमूद केले आहे. त्यामुळे एसी प्रवास करताना जीएसटीचा अधिभारही सहन करावा लागणार आहे. त्यात आवश्यकतेनुसार मुंबई शहर वाहतूक प्रकल्पा अंतर्गत (एमयूटीपी) अधिभारही समाविष्ट करण्याची सूचना बोर्डाने केली आहे. एसी तिकीट, पासधारकांना नियमित फर्स्ट क्लासमधून प्रवास करण्याची मुभा आहे. साप्ताहिक, पंधरवडा आणि मासिक स्तरावरही पास ​देण्यात येणार आहेत. त्यासाठी पाच, साडेसात आणि १० एकेरी प्रवासाप्रमाणे दर आकारले जाणार आहेत.

शनिवार-रविवारी विश्रांती
एसी लोकल सोमवार ते शुक्रवार अशी पाच दिवस चालणार असून शनिवार-रविवारी या लोकलला विश्रांती दिली जाणार आहे. प्रवासी सुरक्षेच्या दृष्टीने प्रत्येक डब्यात सीसीटीव्ही, अग्निशमन यंत्रे असतील, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही रेल्वे बोर्डाने दिली आहे. सोमवारी प्रवाशांसाठी पहिली सेवा अंधेरी ते विरारपर्यंत दुपारी २.१० वाजता सुरू होणार आहे. त्यानंतर नियमित फेऱ्या चालविल्या जाणार आहेत.
प्रवास तिकीटदर (अंदाजित)
चर्चगेट ते मुंबई सेंट्रल ६० रु.
चर्चगेट ते दादर ९० रु.
चर्चगेट ते वांद्रे ९० रु.
चर्चगेट ते अंधेरी १३५ रु.
चर्चगेट ते बोरिवली १८५ रु.
चर्चगेट ते भाईंदर २०५ रु.
चर्चगेट ते वसई २१० रु.
चर्चगेट ते विरार २२० रु.
गाडीचा वेग : ११० किमी प्रतितास
प्रवासी क्षमता : ५,९६४ आसने : १,०२८

असे आहे वेळापत्रक
एसी लोकल जलद मार्गावर चालविण्यात येणार असून फक्त सकाळची पहिली फेरी धिम्या मार्गावर चालेल. ही लोकल महालक्ष्मी स्थानकातून सकाळी ६.५८ वाजता सुटेल आणि बोरिवलीला धिम्या मार्गावरून स. ७.५० वाजता पोहोचेल. बोरिवलीहून चर्चगेटपर्यंतची जलद सेवा स. ७.५४ वाजता सुटणार आहे.
बोरिवली (स. ७.५४) ते चर्चगेट (स. ८.५०)
चर्चगेट (स. ८.५४) ते विरार (स. १०.१३)
विरार (स. १०.२२) ते चर्चगेट (स. ११.१६)
चर्चगेट (स. ११.५०) ते विरार (दु. १.०५)
विरार (दु. १.१८) ते चर्चगेट (दु. २.४४)
चर्चगेट (दु. २.५५) ते विरार (दु. ४.१२)
विरार (दु. ४.२२) ते चर्चगेट (सायं. ५.४२)
चर्चगेट (सायं. ५.४९) ते बोरिवली (सायं. ६.४१)
बोरिवली (सायं. ६.५५) ते चर्चगेट (सायं. ७.४४)
चर्चगेट (सायं. ७.४९) ते विरार (रा. ९.१५)
विरार (रा. ९.२५) ते चर्चगेट (रा. १०.४८)

एसी लोकल पाहण्याची संधी
पश्चिम रेल्वे प्रशासनाने मुंबईकरांना एसी लोकल पाहता यावी यासाठी मुंबई सेंट्रल स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक ५ वर एसी लोकल उभी करण्यात येणार आहे. सोमवारी सकाळी १०.३० ते दुपारी १ वाजेपर्यंत ही लोकल मुंबईकर पाहू शकणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments