Thursday, May 2, 2024
Homeसंपादकीयविशेष लेखभुजबळांची तोफ धडाडणार!

भुजबळांची तोफ धडाडणार!

मुलुख मैदानी तोफ म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री व गृहमंत्री छगन भुजबळ महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळा प्रकरणी गेल्या दोन वर्षांपासून तुरुंगात होते. शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. या निर्णयामुळे भुजबळांना मोठा दिलासा मिळाला. भुजबळ तुरुंगात असल्यामुळे राष्ट्रवादीचे मोठे नुकसान झाले. सत्ताधारी शिवसेना,भाजपाचे तर चांगलेच फावले होते. भुजबळांनी तुरुंगातून बाहेर येऊ नये यासाठी मोठे प्रयत्न झाले होते. सतत पाठपुरावा करुनही भुजबळ कुटुंबियांना, समर्थकांना पक्षाला न्याय मिळत नव्हता. मात्र कधी कुणाला नशीबाची कशी साथ मिळेल हे सांगता येत नाही. विशेष म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने काही महिन्यांपूर्वी आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यात केलेले बदल छगन भुजबळ यांच्या पथ्यावर पडले. त्यामुळेच त्यांना आज जामीन मिळाला. १४ मार्च २०१६ रोजी छगन भुजबळ यांना अटक करण्यात आली होती. तेव्हापासून सातत्यानं ते जामिनासाठी प्रयत्न करत होते, पण त्यांना दिलासा मिळत नव्हता. मध्यंतरी त्यांची प्रकृतीही चांगलीच खालावली होती. ते कारण पुढे करूनही त्यांनी जामीन अर्ज केला होता. मात्र तोही नामंजूर झाला होता. आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यातील (मनी लॉंड्रिंग) कलम ४५ अन्वये बेहिशेबी मालमत्ता जमा करणाऱ्यांना गुन्हा सिद्ध होईपर्यंत अमर्याद काळ तुरुंगात ठेवण्याची तरतूद होती. ही तरतूद सर्वोच्च न्यायालयाने घटनाबाह्य ठरविली होती. ‘पीएमएलए’च्या कलम ४५ अन्वये आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपींचा जामीन नाकारला जात होता. मात्र सर्वोच्च न्यायालयाने हे कलम अवैध आणि जगण्याच्या अधिकाराचे उल्लंघन असल्याचे नमूद करत नुकतेच ते रद्द केले होते. भुजबळांना तर दिलास आहेच परंतु राष्ट्रवादी काँग्रेसला तसा मोठा दिलासा आहे. राष्ट्रवादी मध्ये पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नंतर सर्वात ज्येष्ठ नेते भुजबळ हेच आहेत. भुजबळ यांना तुरुंगात टाकून भाजपा शिवसेनेला उत्तर महाराष्ट्रात मोठा फायदा झाला. उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादी कमजोर झाली. परंतु भुजबळ तुरुंगातून बाहेर पडल्यामुळे ते जोमाने कामाल लागले तर पुन्हा शिवसेना, भाजपाची पंचाईत होणार आहे. भुजबळ हे माळी समाजाचे मोठे नेते असून ओबीसी समाजासाठी ते काम करतात. समता परिषदेच्या माध्यमातून सर्वत्र त्यांचे कार्यकर्ते आहेत. शिवसेना, भाजपाने भुजबळांसारख्या नेत्याला जाणून बुजून तुरुंगात डांबून ठेवल्याने ओबीसी समाजातही सरकारच्या विरोधात चीड आहे. भुजबळही सभांमधून सरकारने केलेल्या अन्यायाचा पाढा वाचतील. पुढच्या वर्षी विधानसभा लोकसभा निवडणूका होणार आहेत. राष्ट्रवादी पूर्ण ताकदीने मैदानात उतरतील. राष्ट्रवादीने हल्लाबोल यात्रेच्या माध्यमातून चांगली वातावरण निर्मीती केली. परंतु त्या यात्रेत मुलूखमैदानी तोफ भुजबळांची कमतरता होती. भुजबळ काही दिवस आराम करुन पुन्हा मैदानात उतरल्या शिवाय राहणार नाही. शिवसेना,भाजपाने त्यांच्या विरोधकांना सत्तेचा दुरुपयोग करुन तुरुंगात डांबण्याचे काम सुरु केले होते. त्याचाच एक भाग होता. भुजबळ कशाप्रकारे उत्तर देतील यावर बरचं काही अवलंबून आहे.

वैदेही तामण
मुख्य संपादक

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments