Monday, May 6, 2024
Homeसंपादकीयविशेष लेखमातोश्रीपुढे भाजपाचे लोटांगण!

मातोश्रीपुढे भाजपाचे लोटांगण!

शिवसेनेवर चौफेर टीका करणाऱ्या भाजपाला शिवसेना विधानसभा, लोकसभा निवडणूकीत सोबत पाहिजे म्हणून शिवसेनेसोबत भाजपाने टाळीसाठी हात पसरवले आहेत. भाजपाचे ज्येष्ठ नेते राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना टाळीसाठी शिवसेनेच्या मातोश्रीपुढे झुकण्याचा ठेका मिळाला आहे. शिवसेना,भाजपाने मुंबई महापालिका निवडणूकीत एकमेकांचे वस्त्रहरण केले होते. मात्र शिवसेनेने एकला चलोरेची भूमिका घेतल्यामुळे भाजपाची टरकली आणि लोटांगण सुरु झाले. महापालिका निवडणूकीच्या वेळी शिवसेना हा भ्रष्टाचारी पक्ष होता आता विधानसभा,लोकसभा निवडणूका येत आहेत त्यावेळी शिवसेना हा पक्ष स्वच्छ झाला का? मुंबई महापालिकेतील घोटाळ्यांची मालिका संपता संपत नाही. पारदर्शकता आणि स्वच्छ कारभाराच्या केंद्राच्या अहवालात मुंबई महापालिकेला पाटणा महापालिकेइतके गुण मिळाले होते. शिवसेनेने मुंबईला पाटणा शहराच्या बरोबरीला आणून दाखवले आहे. अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर केली होती. ‘राज्य सरकारमुळे मुंबई किमान तिसऱ्या स्थानावर आहे. अन्यथा मुंबई महापालिका केंद्राच्या सर्वेक्षणात तळाला असती. राज्य सरकारमुळेच मुंबई आर्थिक सर्वेक्षण अहवालात तिसरी आहे. अशी टीका केली होती. ‘विकास आणि पारदर्शी कारभार हाच आमचा अजेंडा आहे असे त्यावेळी फडणवीस म्हणाले होते. पारदर्शक कारभाराचा मुद्दा आम्ही मांडतच राहणार आणि तुमचा भ्रष्टाचार समोर आणत राहणार. अस जर त्यावेळी शिवसेनेला म्हणाले होते तर आता शिवसेनेत असं काय पारदर्शक कारभार दिसून आला की,शिवसेनेसोबत युती करायची आहे. एकीकडे स्वबळाची भाषा करायची व दुसरीकडे लाचारी पत्करायची अशा पध्दतीने भाजपा शिवसेने समोर लोटांगण घालत आहेत. शिवसेनाही सत्तेत सहभागी असून ते सत्तेचा मलीदा खात आहेत परंतु दररोज भाजपावर टीका करत आहेत. दोन्ही पक्षांचा तमाशा जनता बघत आहेत. एकमेकांच्या औकादी काढणारे एकत्र सत्तेचा मलिदा खाऊन जनतेला मुर्ख बनवण्यात तरबेज आहेत. शिवसेनेने एकला चलोरेची हाक दिल्या नंतर भाजपा त्यांना इशारे करत आहेत. तर दुसरीकडे शिवसेना त्यांच्या मुखपत्रातून टीका करत आहेत की,सरकारचे विकासाच्या योजनांच्या अंमलबजावणीचे काम म्हणजे एक प्रकारे भुताटकी असून हे अदृश्य भूत ज्याने त्याने शोधायचा प्रयत्न करायला हवा. म्हणजेच शिवसेनेने आपल्या मुखपत्रातील राज्य शासनाच्या कारभारावर टोला लगावला. शिवसेना सत्तेसाठी लाचारी पत्कारुन जर भाजपाशी पुढच्या निवडणूका एकत्र लढण्याचा विचार केला तर तो त्यांच्यासाठी आणि भाजपासाठी धोक्याचेच आहे. दोन्ही पक्ष उमेदवारांची चाचपणी करत आहेत. मात्र मुनगंटीवार काय दिवे लावलात आणि त्या दिव्याचा प्रकाश मातोश्रीवर पडतो का? यावर बरच काही अवलंबून राहिल. मात्र दोन्ही पक्षांनी एकत्र निवडणूका लढल्या तर तो निर्णय त्यांच्यासाठी राजकीय आत्महत्या ठरेल.

वैदेही ताम्हण
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments