आपल्या क्षेत्रात नाव कमवणारी मंडळी खूप कमी असते. परंतु पत्रकारिता आणि साहित्य क्षेत्रात स्वत:चा वेगळा ठसा उमटवणारे आणि जगातील साम्यवादी क्रांतीचा इतिहास अत्यंत सोप्या शब्दांत मराठी वाचकांपर्यंत पोहोचविणारे ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार अरुण साधू हे एक होते. त्यांचं सोमवारी २५ सप्टेंबर रोजी पहाटे निधन झालं. ते ७६ वर्षांचे होते. प्रकृती अस्वास्थामुळं रविवारी सकाळी त्यांना मुंबईतील सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथंच आज पहाटे साडेचारच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. साधू यांच्या निधनामुळं पत्रकारिता, साहित्य व सामाजिक क्षेत्रातील ‘साधुत्व’ हरपले. तब्बल ३० वर्षांच्या पत्रकारितेच्या कारकिर्दीत अरुण साधू यांनी केसरी, माणूस, इंडियन एक्स्प्रेस, टाइम्स ऑफ इंडिया, फ्री प्रेस जर्नल अशी विविध वृत्तपत्रे व साप्ताहिकांतून काम केलं. सहा वर्षे ते पुणे विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागाचे प्रमुख होते. मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषांवर त्यांचं प्रभुत्व होतं. ‘लिटरेचर इन हरी’ समजल्या जाणाऱ्या पत्रकारितेतील लिखाणाबरोबच साधू यांचं इतर लेखनही सातत्यानं सुरू होतं. विविध कथासंग्रहांसह तब्बल १२ कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. राजकीय पार्श्वभूमीच्या त्यांच्या कादंबऱ्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली. ‘सिंहासन’, ‘मुंबई दिनांक’ या कादंबऱ्यांवर आलेला चित्रपटही गाजला.
कादंबऱ्यांबरोबरच त्यांनी समकालीन इतिहासाचंही लेखन केलं. त्यांच्या ओघवत्या लिखाणामुळं मराठी वाचकांना रशिया, चीन व क्युबातील साम्यवादी क्रांत्यांची ओळख झाली. विशेषत: तरुणांमध्ये साम्यवादी राजकारणाबद्दल उत्सुकता निर्माण झाली. पत्रकारितेतून आल्यामुळं त्यांच्या लिखाणात एक सहजता होती. त्यामुळंच कठीण विषयही ते सहज समजावून सांगत. अरुण साधू हे नावाप्रमाणेच साधे होते. लेखक असल्याचा बडेजाव त्यांनी कधी मिरवला नाही. ते केवळ पुस्तकांतच रमले नाहीत. अनेक पुरोगामी चळवळीत त्यांचा प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष सहभाग होता. ‘ग्रंथाली’सारख्या वाचक चळवळीत ते अखेरपर्यंत सक्रिय होते. ८०व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद भूषविण्याचा मान त्यांना मिळाला होता. कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा ‘जनस्थान’ व अमेरिकेतील महाराष्ट्र फाऊंडेशनच्या जीवनगौरव पुरस्कारानंही त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. आंतरराष्ट्रीय व्यवहार आणि सामाजिक स्थित्यंतराचे अभ्यासू निरीक्षक असलेल्या साधू यांनी मराठी वाचकाला वास्तववादी दर्शन घडवले. त्यांच्या कादंबऱ्या समकालीन राजकीय- सामाजिक स्थितीचे यथार्थ दर्शन घडवितात. मराठी साहित्याला समृद्ध करतानाच त्यांनी पत्रकारितेला एक वेगळा आयाम दिला त्यासोबतच पत्रकारांच्या नव्या पिढ्या घडविल्या. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या.
अध्यक्षपदाचा गौरव प्राप्त झालेल्या साधू यांचे व्यापक लिखाण पत्रकारिता आणि साहित्यविश्वात येऊ पाहणाऱ्यांसाठी नेहमीच मार्गदर्शक ठरेल. त्यांच्या निधनाने केवळ एक व्यासंगी पत्रकार आणि लेखकासोबतच पत्रकार घडविणारा प्राध्यापक आपण गमावला आहे.