मनसे तर्फे एल्फिन्स्टन दुर्घटने प्रकरणी राज ठाकरे यांनी संताप मोर्चा काढला परंतु यामध्ये मोदी सरकारच्या धोरणावर आणि घोषणावंर सडकून टीका केली. दसऱ्याच्या दिवशी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी भाजपावर सडकून टीका केल्यानंतर संधी मिळताच मनसे प्रमुख ठाकरे यांनीही गुरुवारी भाजपावर हल्लाबोल केला. ठाकरे यांनी त्यांच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार कश्या पध्दतीने काम करत आहेत त्याचा कसा फटका बसला यावर तोफ डागली. खरतर गुरुवारचा मोर्चा हे तर निमित्त होते परंतु ठाकरे यांनी मोदी सरकारला प्रत्येक वेळी त्यांच्या कारभारवर प्रश्न निर्माण करायला सुरुवात केली आहे. गेल्या बऱ्याच दिवसांपासून मनसे प्रमुख ठाकरे हे गप्प बसलेले होते. मात्र त्यांचा फेसबुक पेज लाँच झाल्यानंतर आणि मध्यावधीच्या बातम्यांना पेव फूटल्यानंतर त्यांनीही सक्रियपणा दाखवायला सुरुवात केली आहे. ठाकरे यांनी पुन्हा एकदा नोटबंदीवरुन पंतप्रधानांना घेरले.
देशातील महत्त्वाचे प्रश्न सुटलेले नाहीत. या प्रश्नातून मार्ग काढायचे सोडून नोटाबंदीसारखा निर्णय पंतप्रधानांनी घेतला. स्वच्छ भारत अभियान आणि योगाचे महत्त्व सांगत बसले, मात्र या सगळ्यामुळे सामान्य माणसाचे नुकसानच झाले. जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवाकर कसा भरायचा हे चार्टड अकाऊंटंटलाही कळत नाही अशी अवस्था आहे. हेच का अच्छे दिन? असा प्रश्न उपस्थित केला. १५ लाख रूपये प्रत्येकाच्या खात्यात येणार होते त्याचे काय झाले? असे प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केले. ‘प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख’ बाबत अमित शहा म्हटले होते की तो तर ‘चुनावी जुमला’ होता. नितीन गडकरी जाहीर मुलाखतीत म्हणतात ‘अच्छे दिन’चे हाडूक आमच्या गळ्यात अडकले आहे. यावरूनच सरकार किती दुटप्पी आहे हे स्पष्ट होते असाही आरोप त्यांनी केला. जी अवस्था केंद्रात ती अवस्था राज्यातही.
शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली तर नुकसान होईल हे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी म्हटले. म्हणजे राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी ही देखील राज्य सरकारने मारलेली थाप आहे असाही आरोप राज ठाकरेंनी आपल्या भाषणात केला. बुलेट ट्रेनला राज ठाकरेंनी कडाडून विरोध केला. गुजरात आणि मुंबईतील मूठभर गुजराती व्यापाऱ्यांसाठी बुलेट ट्रेनचा घाट घातला जातो आहे त्याची गरजच काय? कोणता मुंबईकर मुंबईहून बुलेट ट्रेनने अहमदाबादला जाणार आहे? असाही प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केला. खरतर जनतेला भेडसावत असलेले प्रश्न आणि होणारा त्रास याबद्दल यावर बोट ठेवत त्यांनी सरकारवर टीका केली. नरेंद्र मोदी गुजरातचे पंतप्रधान होते त्यावेळी त्यांच्या कामाचा स्तुती केली होती. तसेच लोकसभेच्या वेळी माझे खासदार निवडूण आले तर ते मोदींना मदत करतील असं जाहीर केल होत. मात्र त्याची किंमत त्यांना मोजावी लागली होती. मोदी पंतप्रधान बनले, मात्र तेव्हापासून त्यांच्या कामकाजा बद्दल वाभाडे काढण्याची एकही संधी आता ठाकरे सोडत नाही. सरकारच्या धोरणावर त्यांच्याच पक्षातूनही माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिंह,माजी केंद्रीय मंत्री अरुण शौरी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजु शेट्टी,शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनीही प्रश्न चिन्ह उपस्थित केले होते.पण सरकारच्या कामाकाजात काही बदल घडेल का? हाच खरा प्रश्न.