Placeholder canvas
Monday, May 6, 2024
Homeमुख्य बातम्याआज जागतिक महिला दिन... आक्का, मुलांना स्वप्न दाखवणारी "आई"

आज जागतिक महिला दिन… आक्का, मुलांना स्वप्न दाखवणारी “आई”

आज जागतिक महिला दिन..सगळ्याच महिला कर्तृत्वान असतात म्हणूनच समाज टिकून आहे..आजी,आई,बहीण,बायको,मुलगी,मैत्रीण ही तिचीच रूपं..या “ती”ला मनपूर्वक शुभेच्छा..आज पालकमंत्री संभाजीराव पाटील आणि अरविंद पाटील यांच्या पाठीशी ढाल होऊन उभारलेल्या माजी खासदार रुपताई पाटील यांच्याविषयीचे माझे मत….

आक्का, मुलांना स्वप्न दाखवणारी “आई”

महाराष्ट्राचे कामगार कल्याणमंत्री आणि लातूरचे पालकमंत्री संभाजीराव पाटील,आणि माझे मित्र अरविंद पाटील यांच्या मातोश्री,लातूरकरांच्या आक्का यांचा आज वाढदिवस.आक्का,एक आदर्श माता आहेत,येणाऱ्या प्रत्येकाची काळजी घेणारी दायी आहे.दिलीपराव पाटील यांच्या निधनानंतर घरात निर्माण झालेल्या प्रसंगावर हळुवार तोडगा काढून आपल्या मुलांना समर्थपणे कामात उभे करणारी,परिस्थितीवर मात करून मुलांच्या पंखात बळ निर्माण करून उडण्याची उमेद निर्माण करणारी आक्का एक संघर्ष यात्री आहे म्हटले तर वावगे होणार नाही.घरातच राजकारणाचे बाळकडू मिळालेल्या आक्काला खासदारकी सहज लीलया मिळाली.भारतीय जनता पक्षाच्या वाटेला एक जागा आली,गोपीनाथ मुंडे यांची राजकीय खेळी यशस्वी झाली मात्र एका माजी मुख्यमंत्र्यांचे घर फुटले.त्या काळातील संघर्ष आक्काने स्वीकारला,एखाद्या रणरागिणीसारख्या आक्का लढत राहिल्या.कुणालाही तोडायचे नाही,तोंडातून अपशब्द वापरायचे नाहीत,राजकारणात मित्र जोडत जायचे हा कानमंत्र त्यांनी मुलांना दिला.मुख्यमंत्र्यांची सून म्हणून महाराष्ट्रात ओळखण्यापेक्षा आपली स्वतंत्र ओळख निर्माण करण्याचा सतत प्रयत्न केला.दोन्ही मुलांना राजकारणाचे बाळकडू देताना त्यांनी खूप काळजी घेतली.आज सगळ्याच क्षेत्रात धडाडीने मुले राजकारण पुढे नेत आहेत.आक्का समुद्राच्या पाण्यासारख्या शांतपणे हे सगळे पाहत आहेत.जिथे मुलांना शक्यच होणार नाही,अश्या ठिकाणी त्या स्वतः भेटण्यासाठी जातात आणि सामान्यातील सामान्य माणसाला भेटण्यासाठी वेळ देतात.अनेक चढउतार आयुष्यात पाहताना आक्का कधीच डळमळल्या नाहीत.जगण्याच्या स्पर्धेत आपल्या मुलांना हरखून जाऊ द्यायचं नाही,हरवू द्यायचं नाही तर त्याच्यासाठी स्वप्न पेरत जायचं असा ध्यास घेणारी ही एक ध्येयवेडी आई आहे.दिलीप दादा असताना कधीही उंबरठा न ओलांडनारी ही माता,लोकसभेत लातूरचे प्रतिनिधित्व करेल असे कधी वाटलेच नव्हते,पण आक्काने समर्थपणे खासदारकी पेलली आणि न्याय दिला.आज दोन्ही मुलांच्या स्वप्नात रंग भरण्याचे काम आक्का करत आहेत.खरंतर दिलीपराव पाटील यांचे राजकारण मलाही जवळून पाहता आले आहे.खालच्या वाड्यावर रस्त्यावर पोस्टाच्या बाजूला असलेल्या ऑफिसमध्ये बसून ते आपला तालुका सांभाळायचे.निवडणुकीत सगळ्या आघाड्या ते सांभाळायचे.माजी मुख्यमंत्री डॉ शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या निवडणुकीत अनेक रामबाण उपाय ते शोधून काढायचे.मुळातच शेतकरी कामगार पक्षाचा हा तालुका,गावोगावी डोके फोडणारे आणि फोडून घेणारे कार्यकर्ते मात्र दिलीप भाऊचा आदेश झाला की सगळे शांत व्हायचे.आक्काचे माहेर मूळज.चालुक्य घराणे राजकारणी..आक्काचे चुलते जुने राजकारणी..आमदार भास्करराव चालुक्य..त्या घराण्याला राजकारण पूर्वीपासून माहिती.
सर्वसामान्यांत मिळून मिसळून असणारे, मितभाषी, गरिबांच्या न्याय्य हक्कांसाठी लढणारे असे मनमिळाऊ व्यक्तिमत्त्व म्हणून भास्करराव चालुक्य यांची ओळख होती. भास्करराव यांनी १९६७, १९७२ आणि १९७८ असे सलग तीन वेळा उमरगा तालुक्याचे विधानसभेत प्रतिनिधित्व केले. समिती, उपविधान समिती व अंदाज समितीचे सदस्य, एप्रिल १९७८ मध्ये उपविधान समितीचे प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.माजी संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे ते विश्वासू सहकारी होते. १९५५ ते १९६९ या काळात ते भारत शिक्षण संस्था व श्री शिवाजी महाविद्यालयाचे सहसचिव होते. १९६० ते १९६५ या कालावधीत त्यांनी उस्मानाबाद जिल्हा बँकेचे अध्यक्षपद भूषवले. १९६४ ते १९७० पर्यंत ते को-आॅपरेटिव्ह जनरल इन्शुरन्स सोसायटीच्या(मुंबई) संचालक मंडळाचे सदस्य होते. लातूर येथील जवाहर सूतगिरणीचे अध्यक्ष, महाराष्ट्र स्टेट को-आॅपरेटिव्ह बँकेचे डायरेक्टर, महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्डाचे सभासद, उमरगा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सदस्य, उस्मानाबाद जिल्हा लोकल बोर्डाचे सदस्य, उमरगा पंचायत समितीचे पहिले सभापती, उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे सदस्य अशा विविध पदांवर त्यांनी काम केले होते.अशा राजकीय घराण्याचा वारसा अक्काना लाभला. राजकारणाचे बाळकडू आपल्या मुलाला देण्याची कधीच इच्छा नव्हती म्हणून पालकमंत्री संभाजीराव पाटील यांना पायलट बनवण्याचं त्यांचं स्वप्न होत..घर विभक्त झालं आणि राजकारणाच्या पटलावर अक्कासह सगळ्यांनाच यावं लागलं..तेव्हापासून आजपर्यंत त्या आपल्या मुलांना एक शिस्तीत राहण्याचं राजकारण शिकवत आहेत.अत्यंत संयमी आशा अक्का लहानसहान घटनांनी व्यथित होताना दिसतात.पण त्या कधीच ढळत नाहीत.कुटुंबाची होणारी राजकीय वाढ त्या आपल्या डोळ्यांनी पाहतांना त्यांच्यात एक आशावाद दिसून येतो.उंच आकाशात भरारी मारण्याची स्वप्ने दाखवणारी माता,त्यासाठी कुठेही संयम न ढळू देण्यासाठी सतत डोळ्यात तेल घालून जागणारी आई,सतत मुलांच्या राजकीय हालचालीवर बारीक लक्ष ठेवून काम करून घेणारी आई खऱ्या अर्थाने आज एक आदर्श माता आहे.अनेकजण आपली वैयक्तिक सुखदुःख घेऊन अक्काकडे येत असतात.चहा घेतला का,जेवण करूनच जा असा आग्रह करणाऱ्या अक्का आजही सगळ्यांना आपल्या वाटतात.
कालपरवाची घटना मुद्दामहुन सांगावी वाटते,शिवजयंतीचा कार्यक्रम संपवून आम्ही घरी निघालो.मध्येच करवंद भैय्या म्हणाले,जेवरीकर साहेब आपल्याला आक्कानी घरी जेवायला बोलावलंय..हे सगळं राजकारण्याच्या घरात मला नवीन वाटलं.इतके सगळे थकलेले असताना जेवणाची सरबराई करून आनंदाने जेवू घालणाऱ्या राजकीय अक्का खरच ग्रेट आहेत.आपण कसे प्रेम करतो यावर आपल्या घरातील संस्कार ठरत असतात.त्याक्षणी माझ्यासह अनेकांना याचा आनंद झालाच पण आक्काची कार्यकर्त्यांची काळजी घेण्याचा हा गुण संस्कारातून आलेला असल्याचे जाणवले..राजकारण्यांच्या घरात सतत कार्यकर्त्यांचा राबता असतो,मी पाहतो अक्का अनेकांची वैयक्तिक काळजी घेताना दिसतात.. आक्का एक धीरोदात्त माता आहेत,प्रेमळ आई आहेत..कार्यक्रम यशस्वी होताना डोळ्यात पाणी आणून त्याला दाद देणाऱ्या एक सेंटिमेंटल गृहिणी आहेत.डोक्यावरून पदर न ढळू देताही लोकसभेच्या सभागृहापर्यंत पोचणाऱ्या एक राजकारणी आहेत..आपल्या दोन्ही मुलांना कणखर बनवणाऱ्या जिजाऊ आहेत,शिक्षणाची दारे उघडी करून देऊन शिकवणाऱ्या सावित्रीबाई आहेत,मुलं लहान असताना एकट्यानेच बाहेर पडून परिस्थितीवर मात करणाऱ्या झाशीच्या राणी आहेत..आपल्या मुलांना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपणाऱ्या लाघवी माता आहेत..ही सगळी रूपे अक्कांच्या ठिकाणी आली कुठून?असा प्रश्न कायम मनात घोंगावत असतो.अक्कानी ही सगळी रूपं लीलया पेलली आहेत,म्हणूच अक्का ग्रेट आहेत..
आजच्या महिलादिनी अशी माता मला शब्दबद्ध करता आली..
जी सामान्यांची प्रेरणा आहे..
डोळ्यातील करुणा आहे..
दुबळ्याची माय आहे..
दुधावरची साय आहे..
आश्रितांचा सहारा आहे..
स्वप्नातील पहारा आहे..
अक्का असते एक आई..
नात्यातील मोठी ताई..

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments