
मुंबई: मुंबईकरांना आठवडाभर पाणी संकटाला सामोरं जावं लागणार आहे. 3 डिसेंबर ते 9 डिसेंबर या आठवड्यात पंपिंग स्टेशनमध्ये दुरुस्तीचे काम चालणार आहे. यामुळे संपूर्ण मुंबईत 10 टक्के पाणीकपात केली जाणार आहे. मुंबईकरांना आठवडाभर पाणी जपून वापरावे लागणार आहे.
महापालिकेच्या पिसे पंपिंग स्टेशनमध्ये दुरुस्तीचं काम करण्याचा निर्णय घेण्यात आला त्यामुळे ही पाणी कपात होणार आहे. मुंबई महापालिकेने पाणी कपातीचा अंदाज घेऊन मुंबईकरांना आवश्यक पाण्याचा साठा करून ठेवावा आणि पाणी जपून वापरावे असे आवाहन केले आहे. नव्या धोरणानुसार पालिकेच्या माध्यमातून पिसे उदंचन केंद्रामधील न्युमॅटिक गेट सिस्टीमची दुरुस्ती करण्यात येणार आहे. या कामामुळे मुंबईच्या पाणीपुरवठ्यावर मोठा परिणाम होणार आहे.
मुंबईला ‘या’ धरणांमधून होतो पाणीपुरवठा…
मुंबईला मोडकसागर, तानसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, तुळशी, विहार आणि भातसा अशा 7 धरणांमधून दररोज 3958 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. मात्र यातील तब्बल 27 टक्के पाणी गळती आणि चोरीमुळे वाया जाते. त्यामुळे पालिकेने पाण्याची गळती रोखणे, जलवाहिन्यांची दुरुस्ती आणि यंत्रणेमध्ये सुधारणा करण्याचे धोरण राबवण्यास सुरुवात केली आहे.