Placeholder canvas
Monday, May 6, 2024
Homeमुख्य बातम्याशिवसेना-राष्ट्रवादी सहयोगाने सत्ता स्थापन करणार?

शिवसेना-राष्ट्रवादी सहयोगाने सत्ता स्थापन करणार?

मुख्यमंत्री पदासह १८ पदे सेनेकडे तर आघाडीला प्रत्येकी १२ मंत्रीपदे?

shivsena ncp congressराज्यातील सत्ता स्थापनेचा पेच आता आणखीन वाढला आहे. भाजपने सत्ता स्थापनेचा दावा करण्यात आपण असमर्थ असल्याचं सांगितलं. त्यानंतर राज्यपालांनी दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष असलेल्या शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी आमंत्रण दिलं आहे. त्यांना सोमवारी संध्याकाळी साडेसात वाजेपर्यंतचा वेळ देण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर शिवेसेनेच्या एकमेव केंद्रीय मंत्र्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा देणार असल्याचं ट्विटरवरून सांगितलं.

भारतीय जनता पक्षाने सरकार स्थापन करण्यास असमर्थता दर्शविल्याने राज्यपाल भगतसिंह कोशयारी यांनी 56 जागा जिंकलेल्या दुसऱ्या क्रमांकावरील पक्ष शिवसेनेला सत्ता स्थापन करू शकेल का अशी विचारणा केली आहे. सेना नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात सुरू असलेली चर्चा निर्णायक मोडवर आहे. मध्यावधी निवडणूक कुणालाही नकोत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे पक्ष शिवसेनेला पाठिंबा देऊन सरकार स्थापन करतील, असा दावा सेनेतील वरिष्ठ सूत्रांनी व्यक्त केला.

या माहितीनुसार, शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल. तसेच नगर विकास,महसूल आणि सार्वजनिक बांधकाम ही महत्वाची खाती अशी सेनेला एकूण १८ मंत्रीपदे मिळतील तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि कॉंग्रेसला प्रत्येकी १२ मंत्रीपदे देण्यात येतील.

अर्थात हा सेनेने केलेला दावा असून काँग्रेस मध्ये सेनेला पाठींबा देण्याच्या मुद्यावरून दोन गट पडले आहेत. सेना नेते आणि राज्यसभा सदस्य संजय राऊत हे सोमवारी दिल्लीत काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. या बैठकीतून काय निष्पन्न होईल यावर सेना आणि आघाडीच्या सरकारचे भवितव्य अवलंबून असेल.

दुसरीकडे राष्ट्रवादीतील दुसऱ्या फळीतील नेते हीच संधी आहे असा दावा करून सेनेसोबत जाण्यास तयार आहेत. मात्र, शरद पवार यांनी अजूनही त्यांचे डावपेच जाहीर केलेले नाहीत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments