Placeholder canvas
Sunday, May 5, 2024
Homeमुख्य बातम्याबाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीदिनानिमित्त अभिवादनासाठी शिवतिर्थावर रिघ

बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीदिनानिमित्त अभिवादनासाठी शिवतिर्थावर रिघ

fadnavis and pawar pay tribute sena sena bal thackeray his death anniversary
मुंबई : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज 17 नोव्हेंबरला 7 वा स्मृतीदिन आहे. त्यानिमित्त राज्याच्या कानाकोप-यातून अभिवादनासाठी हजारो कार्यकर्ते दाखल झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टि्वटरवरून आदरांजली वाहिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ यांनी शिवाजीपार्क येथे शिवतिर्थावर येथे जाऊन बाळासाहेबांच्या स्मृतीस अभिवादन केले.

शिवसैनिक शिवाजीपार्कवर सकाळी सहा वाजल्यापासून शिवसैनिकांचा ओघ सुरु झाला आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाची फुलांनी सुंदर सजावट करण्यात आली आहे. आज दिवसभर अनेक दिग्गज नेते या ठिकाणी येऊन बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करतील. दरवर्षी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त हजारो शिवसैनिक शिवाजी पार्क येथील शिवतिर्थावर गर्दी करतात. शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केलं.

बाळासाहेब सर्वांसाठी स्फुर्तीदायक आणि प्रेरणादायी – देवेंद्र फडणवीस ( माजी मुख्यमंत्री )

देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहताना ट्विटरवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात फडणवीस यांनी स्वतः मनोगत व्यक्त केलं आहे. “हिंदूह्रदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी स्मृतिदिनी विनम्र अभिवादन करतो. स्वर्गीय बाळासाहेब हे आमच्या सर्वांसाठी स्फुर्तीदायक आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व होतं. महाराष्ट्राचं सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय वैभव म्हणून ज्यांच्याकडं बघता येईल, असे बाळासाहेब ठाकरे होते. बाळासाहेब हे उर्जेचा स्त्रोत होते. छोट्यातील छोट्या माणसाला बाळासाहेबांच्या विचारानं ऊर्जा मिळायची. आपल्या एका वाक्यानं प्रेरित करण्याची क्षमता आणि किमया आदरणीय बाळासाहेबांमध्ये होती,” असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

प्रादेशिक अस्मितेचा हुंकार स्वाभिमानाने मिरवणारा मराठी माणूस : शरद पवार ( अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस )

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील ट्विट करत बाळासाहेब ठाकरेंना त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त अभिवादन केलं. बाळासाहेब ठाकरे यांनी प्रादेशिक अस्मितेचा हुंकार स्वाभिमानाने मिरवणारा मराठी माणूस उभा केला, असं म्हणत पवारांनी ठाकरेंची आठवण काढली.

दरम्यान, बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनीच शिवसेनेचा मुख्यमंत्री शपथ घेणार अशीही चर्चा सुरु होती. मात्र, तसं काही झालेलं दिसत नाही. अजूनही सत्तास्थापनेसाठी शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बैठकांचे सत्र सुरु आहे. त्यामुळे सत्तास्थापनेवर अंतिम निर्णय कधी होणार हे पाहावे लागणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments