Placeholder canvas
Sunday, April 28, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईअयोध्येत राम मंदिर व्हावे ही काँग्रेसचीही इच्छा : सचिन सावंत

अयोध्येत राम मंदिर व्हावे ही काँग्रेसचीही इच्छा : सचिन सावंत

मुंबई : अयोध्येत राम मंदिर व्हावे ही काँग्रेसचीही इच्छा असल्याचे काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी स्पष्ट केले आहे. किंबहुना माजी पंतप्रधान आणि काँग्रेसचे नेते दिवंगत राजीव गांधी यांनी १९८९ सालीच हे स्पष्ट केले होते, असेही सावंत यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

सचिन सावंत म्हणाले, “अयोध्येत राम मंदिर व्हावे ही काँग्रेसचीही इच्छा आहे. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी १९८९ सालीच हे स्पष्ट केले होते. पण हे मंदिर कुठे व्हावे हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या अधीन होता. त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयानंतर आता हा विषय मिटला असल्याने कोणी कुठे जावे हा ज्याचा त्याचा निर्णय आहे.”

दरम्यान, सरकारला शंभर दिवस पूर्ण झाल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येला जाऊन श्रीरामाचे दर्शन घेणार असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विटद्वारे जाहीर केले होते. राऊत यांच्या या विधानाच्या अनुषंगाने सचिन सावंत यांनी देखील ट्विटद्वारे काँग्रसेची भुमिका मांडली आहे. “आम्ही पक्षीय राजकारण आणि जनप्रदर्शनासाठी मंदिरात जात नाही. आस्थेने आत्मशुद्धीसाठी ईश्वरचरणी लीन व्हावे अशी आमची भावना आहे,” असे सावंत यांनी म्हटले आहे.

मर्यादा पुरुषोत्तम राम त्याग, प्रेम, बलिदान, करुणा समतेचे प्रतिक

पुढे बोलताना सावंत म्हणाले, “मर्यादा पुरुषोत्तम राम हे त्याग, प्रेम, बलिदान, करुणा आणि समतेचे प्रतिक आहेत. त्यांच्या दर्शनाने कोणाही बद्दल द्वेष, तिरस्कार नाहीसा होतो व प्रेम सद्भावना जागृत होते. त्यामुळे जे अयोध्येत जातील त्या सर्वांच्या मनात करुणा आणि समाजातील सर्व वर्गांबाबत सद्भावना जागृत व्हावी अशी प्रार्थना करतो. यातच देशहित आहे. या प्रार्थनेसाठी काँग्रेसचे अनेक जण भविष्यात राम मंदिरात जातीलच.”

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments