मुंबई: महाराष्ट्र लॉकडाऊनच्या उंबठ्यावर येऊन ठेपला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लॉकडाऊनला विरोध करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. एक वर्षभर लोक कसे जगले हे मातोश्रीवर बसून कळणार नाही. त्यासाठी पूर्वीच्या राजांप्रमाणे वस्त्या वस्त्यांमध्ये फिरावे लागेल. तेव्हाच लोक तुम्हाला खुलून बोलतील आणि त्यांची परिस्थिती तुम्हाला कळेल.
गेल्यावेळसारखे शपथविधी झाल्यानंतर कळेल
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी आज पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे. या चंद्रकांत पाटलांनी शरद पवार आणि अमित शाहांच्या कथित भेटीवर भाष्य केले. ते म्हणाले की, राजकारणात अशा भेटी व्हायलाच पाहिजेत. राजकारण हे राजकारणाच्या ठिकाणी असते. मात्र नेत्यांच्या भेटी या व्हायलाच पाहिजे.
महाराष्ट्रात महाविकासआघाडीचे सरकार आल्यापासून अशा भेटीगाठी कमी झालेल्या होत्या. अमित शाह आणि शरद पवार यांची भेट राजकीय होते असे नाही. त्यामागे एखादे समाजोपयोगी कारणही असू शकते असे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. तसेच भाजप आणि राष्ट्रवादीचे काही ठरले तर गेल्यावेळसारखे शपथविधी झाल्यानंतर कळेल असेही पाटील म्हणाले.
भाजपचा लॉकडाऊनला विरोध कायम
‘लॉकडाऊनला आम्ही काय विरोध करणार, तर सर्वसामान्य आणि हातावर काम करणारे विरोध करणार. एक कोटीपेक्षा जास्त लोक हातावर काम करणारे आहे. तुम्ही या लोकांना दर महिन्याला पाच हजारांचे पॅकेज द्या. ते दहा हजार कमवत असले तरीही तुम्ही पाच हजार द्या.
काहीही नियोजन न करता लॉकडाऊन करणे योग्य नाही. आता लॉकडाऊन केला तर तुम्ही एक रुपयाचे पॅकेज देणार नाहीत. एक वर्षभर लोक कसे जगले हे मातोश्रीवर बसून कळणार नाही. त्यासाठी पूर्वीच्या राजांप्रमाणे वस्त्या वस्त्यांमध्ये फिरावे लागेल. तेव्हाच लोक तुम्हाला खुलून बोलतील आणि त्यांची परिस्थिती तुम्हाला कळेल.