Friday, December 6, 2024
Homeमहाराष्ट्रभाजपचे आमदार मंगलप्रभात लोढा यांच्यासह तिघांविरुध्द खंडणीचा गुन्हा दाखल

भाजपचे आमदार मंगलप्रभात लोढा यांच्यासह तिघांविरुध्द खंडणीचा गुन्हा दाखल

bjp-mla- builder-mangal-prabhat-lodha-and-three-others-were-charged-with-ransom-
bjp-mla- builder-mangal-prabhat-lodha-and-three-others-were-charged-with-ransom-

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे मुंबईचे अध्यक्ष, आमदार मंगलप्रभात लोढा यांच्यासह त्यांच्या मुलाविरोधात न्यायालयाच्या आदेशाने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात खंडणी आणि फसवणुकीचा गुन्हा शुक्रवारी दाखल करण्यात आला. यामुळे लोढा यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

याप्रकरणी ज्वाला रिअल इस्टेट प्रा. लि. व मायक्रोटेक डेव्हलपर्सचे मालक मंगलप्रभात लोढा, त्यांचा मुलगा अभिषेक तसेच सुरेंद्रन नायर यांच्याविरोधात खंडणी, फसवणूक, धमकी या कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका ५३ वर्षीय महिलेने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

तक्रारदार महिला वकील असून त्या चतु:शृंगी भागात राहायला आहेत. तक्रारदार महिलेला मुंबईत सदनिका घ्यायची होती. त्यांनी परिचितामार्फत शहानिशा करून मुंबईतील वरळी भागात असलेल्या लोढा पार्कमध्ये असलेल्या ‘मार्किंग्ज’ या गृहप्रकल्पात सदनिका खरेदी करण्याचे निश्चित केले होते. लोढा यांचे कार्यालय मुंबईतील महालक्ष्मी भागात अपोलो मिल कंपाऊंडमध्ये आहे.

तक्रारदार महिलेला विक्री करण्यात येणाऱ्या सदर गृहप्रकल्पातील सदनिकेचे मूल्य पाच कोटी ५९ लाख २७ हजार रुपये ठरविण्यात आले होते. २०१३ नंतर तक्रारदार महिलेने लोढा यांना वेळोवेळी  तीन कोटी ९२ लाख रुपये दिले. मात्र, गेल्या नऊ वर्षात महिलेला सदनिकेचा ताबा मिळाला नाही.

त्यामुळे महिलेने सदनिका खरेदी व्यवहार रद्द करण्याचे ठरवले. त्यानंतर तक्रारदार महिलेला लोढा आणि नायर यांनी धमकावण्यास सुरुवात केली.  चार कोटी १५ लाख १५ हजार एवढी वाढीव रक्कम भरा, अन्यथा सदनिका खरेदी करार रद्द करण्यात येईल तसेच यापूर्वी भरण्यात आलेली रक्कम देखील जप्त करण्यात येईल, अशी धमकी देण्यात आल्याचे तक्रारदार महिलेने फिर्यादीत म्हटले आहे.

‘लोढा यांनी आजतागायत मला सदनिकेचा ताबा दिलेला नाही. मला धमकावून खंडणी मागितली,’ असा फौजदारी दावा महिलेने शिवाजीनगर सत्र न्यायालयात दाखल करून याप्रकरणात गुन्हा दाखल करण्याची मागणी दाव्याद्वारे केली होती.  त्यानंतर न्यायालयाच्या आदेशाने लोढा यांच्यासह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments