Placeholder canvas
Saturday, May 4, 2024
Homeमहाराष्ट्रयेस बँक : राणा कपूरांच्या अटकेमुळे घोटाळे उघडकीस येणार

येस बँक : राणा कपूरांच्या अटकेमुळे घोटाळे उघडकीस येणार

Rana Kapoor Yes Bank,Rana Kapoor, Yes Bank,Rana, Kapoor, Yes, Bankमुंबई  : येस बँक घोटाळा उघड झाल्यानंतर अंमलबजावणी संचालनालयाने  ईडीने शुक्रवारी रात्री राणा कपूर यांच्या घरावर छापा टाकला होता. त्यानंतर शनिवारी दिवसभर कपूर यांची कसून चौकशी करण्यात आली. अंमलबजावणी संचालनालयाने तब्बल ३० तासांच्या चौकशीनंतर येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांना पहाटे अटक करण्यात आली आहे. कपूरांच्या अटकेमुळे घोटाळ्यातील सर्व तथ्य समोर येण्याची शक्यता आहे.

येस बँक संकटात आल्यानंतर रिझर्व्ह बँकेने संचालक मंडळ बरखास्त करीत गुरूवारी प्रशासकांची नियुक्ती केली. यानंतर बँकेतील संशयित घोटाळ्याबाबत तपासाची सूत्रे शुक्रवारी सायंकाळी ईडीने स्वत:कडे घेतली. कारवाईचे आदेश येताच शुक्रवारी रात्री राणा कपूर यांच्या वरळीतील समुद्र महल या घरावर छापा टाकण्यात आला. कपूर यांनी प्रामुख्याने काही वित्त तंत्रज्ञान (अॅपआधारित पेमेंट) कंपन्यांना नियमबाह्य कर्ज दिले व त्यासाठी विदेशी चलन वापरले, ही कर्जे थकीत झाली व त्यामुळेच बँक संकटात आली या संशयावरुन ईडीने हा छापा टाकला होता.

ईडीच्या बॅलॉर्ड पीअर येथील मुंबई प्रादेशिक कार्यालयात शनिवारी दुपारपासून कपूर यांची कसून चौकशी सुरू झाली, ही चौकशी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. या दरम्यान येस बँकेचे संबंध डीएचएफएलशी असल्याचे उघड आले. ईडीकडून इक्बाल मिर्ची प्रकरणात डीएचएफएलचे संस्थापक कपिल वाधवान यांची चौकशी सुरुच आहे. कपूर यांनी डीएचएफएललादेखील कर्ज दिले. ते कर्ज बुडित खात्यात गेले. या कर्जाऊ रकमेचा उपयोग करून डीएचएफएलने इक्बाल मिर्चीला मालमत्ता खरेदी करण्यासाठी मदत केली. या प्रकरणात वाधवान व कपूर या दोघांनी परदेशी पैशांचा धनधुलाईसाठी (मनी लॉन्डरिंग) उपयोग केला, असा ईडीचा संशय असून कपूर यांच्या चौकशीत ही बाब समोर आल्याची माहिती आहे.

राणा कपूर यांच्या तीन मुलींच्या निवासस्थांवरही ईडीचे छापे

राणा कपूर यांच्या तीन मुलींच्या निवासस्थांवरही ईडीने छापे टाकले आहेत. राखी कपूर-टंडन, रोशनी कपूर व राधा कपूर या तिघींच्या मुंबई तसेच, दिल्लीतील घरांवर छापे टाकण्यात आले आहेत. यामुळे येस बँक, डीएचएफएल, राणा कपूर, त्यांच्या कन्या, कपिल वाधवान व इक्बाल मिर्ची, या सर्वांचे एकमेकांशी आर्थिक लागेबांधे असल्याचे मोठा घोटाळा उघड होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आज सकाळी ११ वाजता कपूर यांना कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments