भारतात २०१४ मध्ये नरेंद्र मोदींची लाट नव्हती, ईव्हीएम हॅक करून खोटारडेपणा करून नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले – संजय निरुपम…..
भारतात २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत ईव्हीएम हॅक करून गैरप्रकार झाल्याचा खळबळजनक आरोप भारतीय सायबर तज्ञ सय्यद शुजा यांनी केला. ईव्हीएम हॅक केले जाऊ शकतात असे हि त्यांनी सांगितले. भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांना या प्रकारची माहिती होती. त्यामुळेच त्यांची हत्या झाल्याचा आरोप त्यांनी केला तसेच आपल्या काही सहकारार्यांचा खून झाल्याचा आरोप हि शुजा यांनी केला. या विरोधात मुंबई कॉंग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांच्या नेतृत्वाखाली मुंबई कॉंग्रेसतर्फे बांद्रा पूर्व येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठा मोर्चा काढण्यात आला. याप्रसंगी ईव्हीएमची प्रतिकृती जाळून कॉंग्रेसतर्फे निषेध करण्यात आला. त्यावेळी संजय निरुपम म्हणाले कि आपल्या देशातील २०१४ च्या निवडणुकीत नरेंद्र मोदीची लाट वैगेरे काहीच नव्हती. नरेंद्र मोदी, अमित शाह आणि भाजप सरकारचे ईव्हीएम हॅक करण्याचे खूप मोठे षड्यंत्र होते. काही १४ ते १५ हॅकरना घेऊन त्यांना करोडो रुपये लाच देऊन हे षड्यंत्र रचले गेले. भाजप सरकार चूकीच्या पद्धतीने सत्तेवर आलेले आहेत. ईव्हीएम मशीन हॅक करून खोटारडेपणा करून जिंकलेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सत्तेवर राहण्याचा अजिबात अधिकार नाही. संपूर्ण भारतीयांचा हा खुप मोठा अपमान आहे. देशातील जनता त्यांना कधीच माफ करणार नाही. भाजप सत्तेवर आल्यानंतर त्या १४ ते १५ लोकांपैकी काही लोकांचे खून करण्यात आले. भाजपचेच ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांना हे सगळे माहित होते म्हणून त्यांची हि हत्या करण्यात आली. हे अत्यंत खालच्या पातळीचे राजकारण आहे. याचा मी निषेध करतो.
ते पुढे म्हणाले कि संपूर्ण जगाने ईव्हिएमला नाकारले, सर्व मोठमोठ्या देशांमध्ये मतपत्रिकेद्वारे (बॅलेट पेपर) मतदान होते. परंतु नरेंद्र मोदींनाच ईव्हिएम निवडणुकांमध्ये पाहिजे कारण त्यांना त्यामध्ये घोळ करून पुन्हा जिंकायचे आहे पण आम्ही हे होऊ देणार नाही. आम्हाला ईव्हिएम नको आहे. आम्हाला मतपत्रिकेद्वारे (बॅलेट पेपर) मतदान पाहिजे आहे. “ईव्हीएम हटवा, लोकशाही वाचवा” हीच आमची मागणी आहे. मतदान करणे हे सामान्य जनतेचा मुलभूत अधिकार आहे, परंतु ईव्हीएम हॅक करून निवडणुका जिंकणे, हा लोकशाहीचा अपमान आहे. संविधानाचा अपमान आहे. भाजपचेच ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांना हे सगळे माहित होते म्हणून त्यांची हि हत्या करण्यात आली. मी पंकजा मुंडेना सांगू इच्छितो कि त्यांना मंत्री पदाचे गाजर दिलेले आहे, तुमचे वडील गोपीनाथ मुंडे यांची हत्या झालेली आहे. तुम्ही भाजपा सरकारमधून बाहेर पडून याचा बदला घेतला पाहिजे. या संपूर्ण प्रकरणाची “एनआयए” मार्फत सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी आमची मागणी आहे, असे संजय निरुपम म्हणाले.
संजय निरुपम पुढे म्हणाले कि ईव्हीएम मशीनवर आमचा आता अजिबात विश्वास राहिलेला नाही. “ईव्हीएम हटवा, लोकशाही वाचवा आणि मतपत्रिका (बॅलेट पेपर) पुन्हा आणा”. त्यामुळे येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आम्हालाबॅलेट पेपर पद्धतीनेच निवडणुका पाहिजे आहेत, असे निवेदन आम्ही जिल्हाधिकारी श्री सचिन कुर्वे यांना दिलेले आहे. त्यांना आम्ही विनंती केलेली आहे कि त्यांनी निवडणूक आयोगाकडे आणि संबंधित अधिकार्यांकडे आमचे निवेदन सादर करावे. या मोर्चामध्ये मुंबई कॉंग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांच्यासोबत AICC सरचिटणीस नगमा, माजी खासदार भालचंद्र मुणगेकर, उत्तम खोब्रागडे, माजी आमदार चरणसिंग सप्रा, चंद्रकांत हंडोरे, अशोक जाधव, मुंबई महिला कॉंग्रेस अध्यक्ष अजंता यादव, मुंबई कॉंग्रेस सरचिटणीस भूषण पाटील आणि संदेश कोंडविलकर, प्रवक्ते अरुण सावंत तसेच सर्व जिल्हाध्यक्ष आणि मुंबई कॉंग्रेसचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.