यशराज फिल्म्सच्या ‘ठग्ज ऑफ हिंदुस्थान’ मध्ये अमिताभ बच्चन आणि आमिर खानची जोडी दिसणार हे समजल्यावर चित्रपट चर्चेत आला होता. त्यातच या चित्रपटात ‘लाखो दिलोंकी धडकन’ कतरीना कैफ सुद्धा असणार आहे, हे कळल्यावर चित्रपटाबद्दलची उत्सुकता खूपच वाढली आहे. या चित्रपटात कतरीना एक खास आणि अनोखे ‘पहाडी’ नृत्य सादर करणार आहे.
कॅटरीना आणि नृत्य हे ‘कॉम्बिनेशन’ नेहमीच भन्नाट असतं याबद्दल वादच नाही. ‘शीला की जवानी’, ‘चिकनी चमेली’, ‘माशाल्ला माशाल्ला’, ‘कमली’, ‘बँग बँग’ आणि ताजं-ताजं ‘स्वाग से स्वागत’ ही आणि आणखी अनेक गाण्यातून तिने आपले पदलालित्य दाखवून दिले आहे. त्यामुळेच निरनिराळ्या स्टेज, अवॉर्ड शोज मध्ये तिला मागणी असते.
‘ठग्ज ऑफ हिंदुस्थान’ मधील कॅटरिनाचा नृत्याविष्कार कोरियोग्राफ करतोय ‘डान्सिंगचा बादशाह’ प्रभुदेवा. कॅटरिना या नृत्याची प्रॅक्टिस दररोज पाच-पाच तास करतेय आणि हे ‘पहाडी’ नृत्य बहारदार होईल यासाठी मेहनत घेतेय. सूत्रांनी सांगितल्याप्रमाणे ‘हे गाणे प्रभुदेवा कोरियोग्राफ करीत असून ते भारताच्या ईशान्य भागातील नृत्यशैलीवर आधारित आहे. या नृत्यात प्रभुदेवा यांनी ‘पहाडी’ आणि ‘जिम्नॅस्टिक’ शैलीचे अनोखे मिश्रण केले आहे. या नृत्याच्या चित्रीकरणावेळी फिट दिसावे म्हणून कॅटरिनाने आपल्या ‘डायट’ आणि व्यायाम यात बदल केला असून ती जास्तीत जास्त प्रथिने खाते आणि योग्य व्यायाम करतेय.’
‘ठग्ज ऑफ हिंदुस्थान’ मधील या गाण्याचे चित्रीकरण याच आठवड्यात फिल्म सिटी मध्ये उभारलेल्या भव्य सेटवर होणार असून तिथे ‘सेक्युरिटी’ अत्यंत ‘टाईट’ ठेवण्यात आली आहे.