मुंबई: कोरोना संसर्गावरील उपचारासाठी कोणत्याही पारंपरिक औषधाला मान्यता दिली नसल्याचे खुद्द जागतिक आरोग्य संघटनेनेच स्पष्ट केल्यामुळे ‘कोरोनिल’ औषधाला जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमाणिकरणानुसार आयुष मंत्रालयाने मान्यता दिल्याचा पतंजली आयुर्वेद कंपनीचा दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देखील “सक्षम आरोग्य संस्थांकडून योग्य प्रमाणीकरण झाल्याशिवाय पतंजलीच्या कोरोनिल औषध विक्रीस महाराष्ट्रात परवानगी दिली जाणार नाही.” असं स्पष्ट केलं आहे.
“पतंजलीच्या कोरोनिल औषधाच्या वैद्यकीय चाचणीवर इंडियन मेडिकल असोसिएशनने प्रश्न उपस्थित केले असून, जागतिक आरोग्य संघटनेने सुद्धा हे औषध करोनावर परिणामकारक असल्याचा पतंजली आयुर्वेदचा चुकीचा दावा फेटाळला आहे. इतक्या घाईने हे औषध बाजारात आणण आणि दोन ज्येष्ठ केंद्रीय मंत्र्यांनी याला समर्थन देणं योग्य नाही.” असं अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे.
पतंजलीच्या #Coronil औषधाच्या वैद्यकीय चाचणीवर #IMA ने प्रश्न उपस्थित केले असून #WHO ने सुद्धा हे औषध कोरोनावर परिणामकारक असल्याचा पतंजली आयुर्वेदचा चुकीचा दावा फेटाळला आहे. इतक्या घाईने हे औषध बाजारात आणण आणि दोन ज्येष्ठ केंद्रीय मंत्र्यांनी याला समर्थन देणं योग्य नाही.(१/२)
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) February 23, 2021
तसेच, “जागतिक आरोग्य संघटना, इंडियन मेडिकल असोसिएशन व इतर संबंधित सक्षम आरोग्य संस्थांकडून योग्य प्रमाणीकरण झाल्याशिवाय पतंजलीच्या कोरोनिल औषध विक्रीस महाराष्ट्रात परवानगी दिली जाणार नाही.”असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
तर, केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्या उपस्थितीत हे औषध बाजारात दाखल करण्यात आल्याने आरोग्यमंत्र्यानीच उघडपणे देशवासीयांची दिशाभूल केल्याचा आरोप ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ने (आयएमए) केला आहे. या कथित औषधाला कोणत्या निकषांच्या आधारे मान्यता देण्यात आली, त्याचा तपशील जाहीर करण्याची मागणीही ‘आयएमए’ने केली आहे.
हरिद्वार येथील पतंजली आयुर्वेद या कंपनीने तयार केलेल्या कोरोनिल या औषधाला आयुष मंत्रालयाने जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमाणन योजनेनुसार प्रमाणपत्र बहाल केले. १९ फेब्रुवारी रोजी यासंदर्भात घोषणा करण्यात आली. करोनावर पुराव्यानिशी सिद्ध झालेले कोरोनिल हे पहिले औषध असल्याचा दावा कंपनीने केला आहे.
कोरोनिलची निर्मिती पतंजली रीसर्च इन्स्टिटय़ूटने केली असून त्यांनी जानेवारी २०२० पासून या औषधावर काम सुरू केले होते. केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत एका कार्यक्रमात कोरोनिल औषध बाजारात आणण्यात आले. मात्र आता औषधाच्या विश्वासर्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.