मुंबई: पूजा चव्हाण प्रकरणात नाव समोर आल्यानंतर राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र, शिवसेनेकडून याबाबत अद्याप कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. दरम्यान, पूजा चव्हाण प्रकरणावरून राठोड यांच्यावर भाजपाकडून केल्या जात असलेल्या टीकेला मंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. आपल्याकडेही भाजपा नेत्यांची महिलांसोबतची प्रकरणं आहेत,” असा दावा त्यांनी केला आहे.
राठोड यांच्या राजीनाम्याच्या वृत्तानंतर वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना या प्रकरणावर भूमिका मांडली. “संजय राठोड यांचा राजीनामा ही मीडिया ट्रायलची परिणती आहे. भाजप नेत्यांची महिलांबाबतीच डझनभर प्रकरणे मला सांगता येतील. पण भाजपा नेत्यांसाठी नैतिकता लागू पडत नाही, तिथे नैतिकता संपुष्टात येते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणाबाबत स्पष्ट भूमिका घेऊन योग्य केले. लवकरच याप्रकरणातील सत्य बाहेर येईल,” असं म्हणत वडेट्टीवार यांनी भाजपाला प्रत्युत्तर दिलं आहे.
राठोड यांनी राजीनामा दिल्याच्या वृत्ताला शिवसेनेकडून अजूनही दुजोरा देण्यात आलेला नाही. राठोडांनी राजीनामा मातोश्रीवर पाठवल्याचीच चर्चा आहे. दरम्यान, या प्रकरणावर शिवसेनेचे मंत्री आणि नेतेही सावध भूमिका घेताना दिसत आहेत. शिवसेनेचे नेते आणि राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांनीही तुटक भाष्य केलं. “संजय राठोड हे आमचे सहकारी मित्र आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्याबाबत स्पष्टपणे भूमिका मांडली आहे. राठोड यांच्या राजीनाम्याबाबत मला काहीही माहिती नाही. जी वस्तुस्थिती आहे, ती चौकशीनंतर समोर येईल,” असे दादा भुसे यांनी म्हटलं आहे.
पूजा चव्हाण प्रकरणात नाव आल्यापासून राठोड अज्ञातवासात आहेत. ते नेमके कुठे आहे, याबद्दल कुणीही वाच्यता करताना दिसत नाही. दुसरीकडे भाजपाकडून राजीनाम्यासह त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचीही मागणी केली जात आहे.