मुंबई: अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी विधिमंडळात महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा सामना पाहायला मिळाला. तिसऱ्या दिवसाची सुरुवातच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या खडाजंगीने झाली. भाजप सत्तेत असताना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळातील वृक्षारोपण मोहिमेवर नाना पटोले यांनी सवाल उपस्थित केले. तसेच चौकशीची मागणी सुद्धा केली. त्यावर वाद होत असतानाच सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्याची चौकशी होणार असल्याचे सांगत फडणवीसांना दणका दिला.
हे आहे प्रकरण?
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपची सत्ता असताना 33 कोटी वृक्ष लागवडीची मोहिम राबवण्यात आली होती. 2016 ते 2017 आणि 2019-20 या कालावधीत वन विभागाने वृक्ष लागवड योजनेत 28.27 कोटी वृक्ष लावले. त्यानंतर ऑक्टोबर 2020 च्या शेवटी त्यापैकी 75.63% रोपटे म्हणजे 21 कोटी रोपटे जिवंत आहेत. त्याची अजुनही देखभाल करण्यात येत आहे.
2017 ते 2019 कालावधीत वन विभागाने व्यक्ती, संस्था, सरकारी संस्था, संघटना आणि उद्योग समूहांच्या माध्यमातून 50 कोटी वृक्ष लावण्याची मोहीम राबवली. यासाठी 2016-2017 पासून 2019-2020 पर्यंत 2 हजार 429 कोटी 78 लाख रुपये निधी मिळवला आणि तो पूर्ण निधी वापरण्यात आला. त्यातील 25 टक्के रोपटे जिवंत कशी राहू शकली नाहीत याची चौकशी करण्यात यावी. अशी मागणी दत्तात्रय भरणे यांनी केली. तीच उचलून धरताना याची विधिमंडळाकडून चौकशी व्हावी अशी मागणी नाना पटोले यांनी केली.
यावरून देवेंद्र फडणवीस यांनीही पलटवार केला आणि दोन्ही नेत्यांमध्ये वाकयुद्ध रंगले. त्यात सुधीर मुनगंटीवार यांनी उडी घेत वृक्ष लागवड हे एक ईश्वरीय कार्य असल्याचे सांगितले.
सोबतच वडेट्टीवारांनी सुद्धा याबाबत चौकशी करायला सांगितली. याबद्दल समिती किती दिवसांत स्थापित होणार आणि किती दिवसांत अहवाल येणार अशी विचारणा मुनगंटीवार यांनी केली. त्यानंतर मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 33 कोटी वृक्ष लागवडीच्या मोहिमेची विधिमंडळाच्या संयुक्त समितीमार्फत चौकशी होणार अशी घोषणाच केली.