मुंबई: भाजपच्या भोपाळच्या खासदार प्रज्ञासिंग ठाकूर यांना श्वासोच्छवासाचा त्रास होवू लागल्याने आज मुंबई येथे उपचारासाठी हलविण्यात आले. त्यांना शहरातील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, अशी माहिती खासदार कार्यालयाने दिली. एका महिन्यात रुग्णालयात दाखल करण्याची ही दुसरी वेळ आहे.
१ फेब्रुवारीला त्यांना अशाच मुद्द्यांसाठी नवी दिल्लीतील अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्थान (एम्स) येथे नेण्यात आले. यापूर्वी, कोविड – १९ ची लक्षण दिसू लागल्यानंतर डिसेंबर २०२० मध्ये त्यांना एम्समध्ये दाखल केले गेले होते.
२००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोटातील एक प्रमुख आरोपी म्हणुन त्यांचे नाव घेतले जाते. या दुर्घटनेत १० लोक ठार आणि अनेकजण जखमी झाले होते. त्यांना २०१७ मध्ये राष्ट्रीय तपास यंत्रणेने आरोग्याच्या कारणावरून जामीन मंजूर केला होता.
भोपाळमधील २०१९ लोकसभा निवडणुकीत त्यांनी प्रतिस्पर्धी कॉंग्रेस नेते दिग्विजय सिंह यांचा ३.६ लाख मतांनी पराभव केला. दहशतवादाचा आरोप असलेली व्यक्ति भारतात खासदार बनण्याची ही पहिलीच वेळ होती. महात्मा गांधींचे मारेकरी, नथुराम गोडसे यांना “देशभक्त” म्हणण्यासारख्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे सुश्री ठाकूर प्रसिद्ध आहेत हे विशेष.